हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी – पुणे – विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळी सुरुवात झाली असून आता वेळ कमी उरला आहे. अशातच अजूनही महायुतीमध्ये जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. मात्र, गेल्या काही दिवसांपासून भाजप यादी जाहीर करणार अशी माहिती होती.अखेरीस रविवारी पहिली जम्बो यादी जाहीर होणार आहे. यामध्ये 110 ते 115 नाव असण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपच्या पहिल्या यादीत 110 ते 115 नावं असण्याची शक्यता आहे. यामध्ये विद्यमान आमदारांचा यादीत समावेश असू शकतो. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कामठी मतदारसंघामधून लढणार का यावर केंद्रीय निवडणूक समिती निर्णय घेणार आहे. तर शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे मित्र पक्ष आपली यादी स्वतंत्र घोषित करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.ज्या जागांवर अडचण आहे तिथे तिन्ही पक्षांच्या उमेदवारांवर चर्चा करून मेरिटवर निर्णय होणार असल्याची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची माहिती दिली आहे.
दरम्यान, मध्यरात्री उशिरा भाजपची मुंबईमध्ये बैठक झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक महत्त्वाचे पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते. ही बैठक उशिरा रात्री साडेबारा एकच्या सुमारास होती. फडणवीस आणि बावनकुळे हे रात्री 11.30 वाजता नागपुरातून विशेष विमानाने मुंबईला पोहोचले.
मुंबईतून 5 आमदारांचा पत्ता कट?
तर दुसरीकडे, काही आमदारांचा पत्ताही कट होणार अशी माहितीसमोर आली आहे. मुंबईतल्या ५ आमदारांचा पत्ता कट होणार आहे. विद्यमान आमदारांच्या जागी नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात येणार अशी माहिती समोर आली आहेो. यामध्ये भाजपचे आमदार राम कदम यांचंही नाव असल्याची चर्चा आहे. तर पराग शाह यांच्या जागी प्रकाश मेहता यांचं नाव समोर आलं आहे. भारती लव्हेकर यांच्या जागी संजय पांडे, तमिर सेल्वन यांच्या जागी राजश्री शिरवडकर आणि सुनिल राणे यांच्या जागी गोपाल शेट्टींना उमेदवारी देण्याची जोरदार चर्चा रंगली आहे. मात्र, अद्याप याबद्दल शिक्कामोर्तब झालेलं नाही. मुंबईतील जागावाटपावर अजूनही चर्चा सुरू आहे.
मुंबईत राष्ट्रवादी अजित पवार गटाला मिळणार 3 जागा
मुंबईतील 36 जागांमध्ये सर्वाधिक भाजपला आणि त्यानंतर शिवसेनेला जास्त जागा मिळणार आहेत. राष्ट्रवादीला तीन जागा दिल्या जाणार आहेत. भाजपला 18, शिवसेनेला 15 तर राष्ट्रवादीला 3 जागा मिळतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. यात राष्ट्रवादीच्या वाट्याला अनुशक्ती नगर, वांद्रे पूर्व, शिवाजीनगर- मानखुर्द या जागांचा समावेश आहे.
—- गणेश मारुती जोशी