अवघ्या १३ पोस्टना अभूतपूर्व प्रतिसाद; फॉलोअर्सपेक्षा जनतेचा विश्वास ठरतोय मुंढेंची खरी ताकद
हिंदजागर ऑनलाईन न्यूज पोर्टल | महाराष्ट्र – प्रशासनातील कडक शिस्त, नियमांची तडजोड न करणारी भूमिका आणि थेट कारवाईसाठी प्रसिद्ध असलेले आयएएस अधिकारी तथा अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आता सोशल मीडियावरही स्वतःची वेगळी छाप निर्माण केली आहे.राजकीय नेत्यांच्या तुलनेत कमी पोस्ट करूनही मुंढे यांच्या प्रत्येक पोस्टला मिळणारा प्रतिसाद लक्षवेधी ठरत आहे. सोशल मीडियावरील उपलब्ध तुलनात्मक आकडेवारीनुसार, इन्स्टाग्रामवरील फॉलोअर्स आणि एंगेजमेंट रेटमध्ये मुंढे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच अनेक लोकप्रिय अधिकाऱ्यांनाही मागे टाकल्याचे दिसत आहे.
इन्स्टाग्रामवर मुंढेंचा दबदबा
प्रकाशित आकडेवारीनुसार, तुकाराम मुंढे यांच्या इन्स्टाग्राम खात्याला सुमारे ३४ लाख १५ हजार फॉलोअर्स आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जवळपास २९ लाख २ हजार, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुमारे १३ लाख १ हजार फॉलोअर्स असल्याचे या तुलनेत नमूद करण्यात आले आहे.विशेष म्हणजे मागील ६० दिवसांत तुकाराम मुंढे यांनी केवळ १३ पोस्ट केल्या. याच कालावधीत देवेंद्र फडणवीस यांनी ९७, तर एकनाथ शिंदे यांनी २५ पोस्ट केल्याचे संबंधित आकडेवारीत म्हटले आहे.
प्रत्येक पोस्टला जनतेचा भरभरून प्रतिसाद
फक्त फॉलोअर्सची संख्या नव्हे, तर पोस्टवर मिळणाऱ्या प्रत्यक्ष प्रतिसादामध्येही मुंढे आघाडीवर आहेत. त्यांचा इन्स्टाग्राम एंगेजमेंट रेट २०.३५ टक्के नोंदवण्यात आला आहे. तुलनेत देवेंद्र फडणवीस यांचा ०.५० टक्के, तर एकनाथ शिंदे यांचा ०.२४ टक्के एंगेजमेंट रेट असल्याचे प्रसिद्ध आकडेवारीत नमूद आहे.यावरून किती पोस्ट केल्या यापेक्षा त्या पोस्टमधील काम आणि त्याला मिळालेला जनतेचा प्रतिसाद अधिक महत्त्वाचा ठरत असल्याचे स्पष्ट होते.
‘X’वर फॉलोअर्स कमी; प्रतिसादात मात्र मोठी आघाडी – ‘X’ या समाजमाध्यमावर राजकीय नेत्यांची फॉलोअर्स संख्या अधिक आहे. मात्र पोस्टवरील प्रतिसादाच्या तुलनेत तुकाराम मुंढे यांचा एंगेजमेंट रेट ४.६२ टक्के असल्याचे सांगण्यात आले आहे. देवेंद्र फडणवीस यांचा ०.०७ टक्के, तर एकनाथ शिंदे यांचा ०.०४ टक्के प्रतिसाददर नोंदवण्यात आला आहे.म्हणजेच फॉलोअर्सच्या संख्येत नेते पुढे असले, तरी लोकांच्या प्रत्यक्ष सहभागामध्ये मुंढे आघाडीवर असल्याचे हे डिजिटल चित्र दर्शवते.
विश्वास नांगरे-पाटील, समीर वानखेडे यांच्यापेक्षाही पुढे
लोकप्रिय अधिकाऱ्यांच्या तुलनेतही तुकाराम मुंढे यांची आघाडी मोठी आहे. प्रसिद्ध आकडेवारीनुसार, इन्स्टाग्रामवर समीर वानखेडे यांचे सुमारे ८.४७ लाख, तर विश्वास नांगरे-पाटील यांचे सुमारे ६.१२ लाख फॉलोअर्स आहेत. मुंढे यांच्या खात्यावरील फॉलोअर्सची संख्या ३४ लाखांपेक्षा अधिक आहे.एंगेजमेंटच्या बाबतीतही मुंढे यांचा २०.३५ टक्के प्रतिसाददर असून, विश्वास नांगरे-पाटील यांचा ३.६० टक्के आणि समीर वानखेडे यांचा ३.२० टक्के असल्याचे सांगण्यात आले आहे.
कारवाईचा परिणाम थेट जनतेपर्यंत – अन्नभेसळ, अस्वच्छ हॉटेल्स, कॅन्टीन, डेअरी, खाद्यपदार्थ विक्रेते आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांविरोधात मुंढे यांनी घेतलेल्या कठोर भूमिकेला सोशल मीडियावर मोठा पाठिंबा मिळत आहे.त्यांच्या पोस्टमध्ये केवळ घोषणा नसून प्रत्यक्ष कारवाई, तपासणी आणि नियमभंग करणाऱ्यांवर उचललेली पावले दिसत असल्यामुळे नागरिक त्यांच्याशी जोडले जात असल्याचे या प्रतिसादातून जाणवते.
फॉलोअर्स नव्हे, विश्वासाची कमाई!
सोशल मीडियावरील आकडेवारी वेळेनुसार बदलत असते आणि वेगवेगळ्या विश्लेषण साधनांनुसार एंगेजमेंटचे प्रमाणही बदलू शकते. मात्र सध्याच्या तुलनेतून एक संदेश स्पष्टपणे समोर येतो—अधिकाऱ्याच्या पदापेक्षा त्याच्या कामाचा प्रभाव आणि जनतेने दाखवलेला विश्वास अधिक मोठा असतो.
राजकारणात नेत्यांचा प्रभाव असला, तरी प्रामाणिक काम, धाडसी निर्णय आणि जनहिताची भूमिका यामुळे तुकाराम मुंढे यांनी सोशल मीडियावर स्वतंत्र ‘लोकविश्वासाचा ब्रँड’ निर्माण केला आहे.
– हिंदजागर टीम, विशेष…



