HindJagarNews – Pune – माहायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप अंतिम झालेले नसले तरी इच्छुकांकडून जोरदार तयारी केली जात आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत जागा टिकवताना विद्यमान आमदारांची चांगलीच दमछाक होणार आहे.
दुसरीकडे इच्छुकांना महायुती, महाविकास आघाडी, मनसे, वंचित, तिसरी आघाडी यांसारखे विविध पर्याय उपलब्ध असल्याने शहरातील छत्रपती शिवाजीनगर मतदार संघात कांटे की टक्कर पहायला मिळणार आहे.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीची झालेली पिछेहाट आणि महाविकास आघाडीला मिळालेल्या अभुतपूर्व यशाच्या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकीची गणित बदलणार आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या विविध सर्वेमध्ये विधानसभा निवडणुकीत ही महाराष्ट्रात महाविकास आघाडीला यश मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे महायुतीच्या विद्यमान आमदारांसह अनेक इच्छुकांचा ओढा महाविकास आघाडीची उमेदवारी पदरात पाडून घेण्याकडे आहे. पश्चिम महाराष्ट्राचा विचार करता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे इच्छुकांचा सर्वाधिक ओढा दिसतो.
महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तीन पक्षामध्ये एकमेकांच्या जागांवर दावा सांगण्याची स्पर्धा सुरू आहे. एक आमदार असलेल्या काँग्रेसने लोकसभेच्या यशाचे उदाहरण देत शहरातील तब्बल पाच मतदार संघावर दावा सांगितला आहे. तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून कोथरूडसह वडगाव शेरी व पर्वती मतदार संघाची मागणी केली जात आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने मात्र वडगाव शेरी, हडपसर, खडकवासला आणि पर्वती मतदार संघावर लक्ष केंद्रीत केले आहे.
शिवसेना आणि काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला शिवाजी नगर मतदार संघ 2014 पासून भाजपच्या ताब्यात आहे. विद्यमान आमदार सिध्दार्थ शिरोळे यांच्यासह माजी नगरसेवक सनी निम्हण आणि युवतीच्या माजी शहराध्यक्षा निवेदिता एकबोटे यांनी भाजपकडून निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला केवळ साडेतीन हजाराचे मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या इच्छुकांच्या आशा वाढल्या आहेत. काँग्रेसकडून गतवेळी निसटता पराभव झालेले माजी नगरसेवक दत्ता बहिरट, माजी आमदार दिप्ती चवधरी तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून माजी नगरसेवक श्रीकांत पाटील, अॅड. निलेश निकम, उदय महाले इच्छुक आहेत. दरम्यान, सनी निम्हण यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणूक लढवायचीच, असा पवित्रा घेतला आहे. त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना कार्यक्रमाला बोलवून इतर पर्याय खुले असल्याचे भाजप श्रेष्ठींना दाखवून दिले आहे. त्यामुळे या मतदार संघात उमेदवारीची चुरस वाढली आहे.
काँग्रेस मात्र छत्रपती शिवाजीनगर पक्षाला जागा सोडण्यासाठी आगरीय आहे दत्तात्रेय बहिरट यांना पुन्हा एकदा शिवाजीनगर मधून संधी जाऊ शकती व प्रबळ दावेदार म्हूणन त्यांच्या कडे पाहिलं जाते तसेच 2012 मध्ये नगरसेवक म्हणून निवडून आलेले चंद्रशेखर ऊर्फ सनी निम्हण देखील शिवाजीनगरमधून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत.
आता तिकीट मिळालं नाही म्हणून नाराज झालेले इच्छुक बंडखोरी करून अपक्ष उभे राहणार की तिकीटासाठी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन दुसऱ्या पक्षात जाणार हे लवकरच स्पष्ट होईल. या सर्व पार्श्वभूमीवर बंडखोरीला लगाम लावण्याचे आव्हान महायुती व महाविकास आघाडीसह सर्वच पक्षांसमोर असणार आहे.