HindJagarNews – Pune – मनसेचे पुण्यातील दिवंगत आमदार रमेश वांजळे यांचे सुपुत्र मयुरेश वांजळेंनी राजकारणात एन्ट्री घेतली आहे. मयुरेश वांजळे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. खडकवासला मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी मयुरेश वांजळे इच्छुक आहेत.
निवडणूक लढवण्यासाठी त्यांच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. बहुतांश सर्व पक्षातील नेत्यांची मयुरेश वांजळे यांनी भेट घेतली आहे. ते नेमकं कोणत्या पक्षातून निवडणूक लढवणार आहेत हे अद्याप निश्चित झाले नाही.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांची मयुरेश वांजळे यांनी भेट घेतली. अद्याप कोणत्या पक्षाकडून ते उभे राहणार याबाबत समजू शकलेले नाही. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्याकडून नागरिकांच्या भेटीगाठी सुरू आहेत. मयुरेश वांजळे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्यामुळे खडकवासलामध्ये आता इतर पक्षांचे टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.
मयुरेश वांजळे यांचे वडील रमेश वांजळे यांची पुण्यामध्ये गोल्डमन म्हणून ओळख होती. २००९ मध्ये रमेश वांजळे यांनी मनसेच्या तिकीटावर उमेदवारी घेत भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पराभूत केलं होतं. मनसेचे आमदार असताना त्यांनी मनसे स्टाइलने अनेक आंदोलनं देखील केली. २०११ मध्ये रमेश वांजळे यांचं निधन झालं. त्यांची कन्या सायली वांजळे ही त्या भागातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नगरसेवक आहे.
रमेश वांजळे यांनी आपल्या राजकीय करिअरची सुरूवात गावातील सरपंच म्हणून केली होती. पुणे जिल्हा परिषदेचे उपसभापती असताना ते कॉंग्रेसमध्ये होते. परंतु त्यांना पक्षाकडून तिकीट नाकारल्याने त्यांनी मनसेकडून निवडणूक लढवली आणि त्यात ते विजयी झालेत. परंतु त्यांचं नंतर निधन झालं आणि झालेल्या पोटनिवडणूकीत भीमराव तापकीर यांचा विजय झाला. आता त्यांचे सुपूत्र मयुरेश वांजळे निवडणूकीची तयारी करतांना दिसत आहेत. त्यांनी पायाला भिंगरी लावून संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आहे. यातच त्यांना मनसेत घेऊन विधानसभेची उमेदवारी देण्यात येईल असे सांगण्यात येत आहे.
खडकवासला मतदारसंघाची रचना पाहायला गेलं तर या मतदारसंघाचा ७० टक्के भाग हा शहरी असून ३० टक्के भाग हा ग्रामीण आहे. खडकवासलामध्ये भाजपचे विद्यमान आमदार भीमराव तापकीर असून त्यांच्याविरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून सचिन दोडके इच्छुक आहेत.तर २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत सचिन दोडके यांना अवघ्या २५९५ मतांनी पराभव पत्करावा लागला होता. त्यावेळीच्या निवडणूकीत सचिन दोडके यांनी १ लाख १७ हजार ९२३ मते मिळवित अपयशी झुंज दिली होती. आता पुन्हा एकदा सचिन तोडके हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक आहेत. राष्ट्रवादीच्या पक्ष फुटीनंतर सचिन दोडके यांनी पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे महाविकास आघाडीकडून सचिन दोडके याच मतदारसंघातून निवडणूकीच्या रिंगणात उभे राहतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. लवकरच या मतदारसंघामध्ये इतर पक्षांकडून उमेदवारांच्या नावाची घोषणा होणार आहे.त्यामुळे खडकवासला मतदारसंघात यापैकी २०२४ ला कोण बाजी मारणार ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
—– गणेश मारुती जोशी.