HindJagar News , Report – Pune – भाजपने विदर्भातील 23 उमेदवारांसह 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करीत महायुतीचे दमदार पुढचे पाऊल टाकले असताना महाविकास आघाडीत मात्र अजूनही उमेदवारी यादी अभावी इच्छुकांची , समर्थकांची घालमेल सुरू आहे.काही जागांवरील रस्सीखेच अद्यापही कायम आहे. अशात आता दबावतंत्र म्हणून विद्यमान काही आमदारांची नावे आज रात्री काँग्रेस हायकमांडमार्फत जाहीर होण्याची शक्यता आहे.
काँग्रेसचे नेते दिल्लीत तळ ठोकून
अर्थात तुटेपर्यंत ताणू नका,या शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर ज्या मतदारसंघात एकापेक्षा अधिक दावेदार नाही. ज्या उमेदवाराबाबत अडचण नाही अशाच उमेदवारांचा,विद्यमान आमदारांचा पहिल्या यादीत समावेश असणार आहे. महाविकास आघाडीत मुंबईत शिवसेना उबाठा गट तर विदर्भातील 62 पैकी बहुतांश जागा काँग्रेस लढण्यावर एकमत झालेले असताना रामटेक, राजुरा, दक्षिण, मध्य नागपूरवरून शिवसेना आग्रही आहे तर जिल्ह्यात काटोल, हिंगणा आणि शहरात किमान पूर्व नागपूर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मिळावे यासाठी दोन्ही बाजूने दबाव तंत्र वापरले जात आहे. वेळप्रसंगी परस्परांचे काम आम्ही करणार नाहीत. सामूहिक राजीनामे देऊ असा इशाराही या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसची नेतेमंडळी दिल्लीत तळ ठोकून आहे.
शहरातील सहा मतदारसंघावर काँग्रेचा दावा
शिवसेना प्रवक्ते समता परिषदेचे नेते किशोर कान्हेरे काँग्रेसमध्ये परतले आहेत. दोन तीन दिवसात इतरांचेही पक्ष प्रवेश होऊ शकतात. काँग्रेसच्या यादीत उमेदवारही होऊ शकतात. इकडे शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी शहरातील सहाही जागा काँग्रेसच लढेल याविषयीचा पुनरूच्चार केला. केवळ 3 ते 5 हजारात आमच्या जागा गेल्यावेळी हुकल्याने आमचा दावा योग्यच आहे यावर त्यांनी भर दिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दूनेश्वर पेठे पूर्वमध्ये इच्छुक आहेत तर अजितदादा गटाच्या महिला आयोग सदस्या श्रीमती आभा पांडे देखील महायुतीत इच्छुक असताना भाजपने विद्यमान आमदार कृष्णा खोपडे यांचेच तिकीट जाहीर केले. यामुळे आता गेल्यावेळी अपक्ष लढलेल्या आभा पांडे लढणार का, हा प्रश्न अनुत्तरित आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी ग्रामीण अध्यक्ष बाबा गुजर,शहर अध्यक्ष प्रशांत पवार यांनी तूर्तास आपल्या तलवारी म्यान करून ठेवलेल्या आहेत. अजितदादा गटाकडून त्यांना तसे आदेश देण्यात आल्याचे समजते. या एकंदरीत पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि शिवसेनेकडून आज रात्री उशिरापर्यंत पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.
पहिल्या यादीत कुणाचा समावेश ?
काँग्रेसच्या सुमारे 54 उमेदवारांच्या पहिल्या संभाव्य यादीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (साकोली), विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (ब्रह्मपुरी), ऍड. यशोमती ठाकूर (तिवसा), डॉ नितीन राऊत( उत्तर नागपूर),विरेंद्र जगताप( धामणगाव), आमदार विकास ठाकरे (पश्चिम नागपूर) डॉ सुनील देशमुख (अमरावती), रणजीत कांबळे (वर्धा -देवळी),अमित झनक यांचा प्रामुख्याने समावेश असल्याचे समजते.
—- गणेश मारुती जोशी .