HindJagarNews – Pune – आज भारतीय शहीद पोलीस स्मृती दिन आहे. दरवर्षी 21 ऑक्टोबर हा दिवस पोलिस स्मृती दिन म्हणून पाळण्यात येणार आहे. या दिवशी शहीद पोलिस जवानांना श्रद्धांजली अर्पण केली जाते.
पुणे शहर पोलीस आयुक्तालयातर्फे सोमवारी (दि.21) रोजी सकाळी पुणे ग्रामीण पोलीस कार्यालया जवळील C.P.R परिसरात पोलीस स्मृती दिन साजरा करण्यात आला. वर्षभरामध्ये देशभरात शहीद झालेल्या पोलिसांना यावेळी पोलीस पथकाने आदरांजली वाहत अभिवादन केले.याप्रसंगी पोलीस आयुक्त यांच्या हस्ते ‘स्मृती स्तंभाला’ पुष्पचक्र अर्पण करुन मानवंदना देण्यात आली. त्यानंतर पथकाने हवेत गोळीबार करून शहिदांप्रती आदरांजली वाहिली.
21 ऑक्टोबर 1959 रोजी लडाख येथे चीनच्या सैनिकासोबत लढतांना केंद्रीय राखीव दलाच्या दहा जवानांनी प्राणाची आहुती दिली होती. तेव्हापासून 21 ऑक्टोबर हा पोलिस हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात येतो. वर्षभरात जे जवान देशात आणि राज्यात शहीद झाले अशा जवानांना या 21 ऑक्टोबर रोजी श्रद्धांजली वाहण्यात येते. जिल्ह्याच्या मुख्यालयात या निमित्ताने शहीद पोलिसांना अभिवादन केले जाते. तसेच विविध उपक्रमाचे आयोजनही केले जाते.
महाराष्ट्र पोलिसांकडून अभिवादन :
पोलीस स्मृती दिनाच्या निमित्ताने आपले कर्तव्य पार पाडत असताना देशासाठी प्राण गमावलेल्या हुतात्म्यांना पोलीस स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र पोलीस दलाच्या वतीने आदरांजली व्यक्त करण्यात आली आहे. “हे राष्ट्र त्यांचे बलिदान कधीच विसरणार नाही”.
— गणेश मारुती जोशी.