Hindjagarnews – Reporter – Pune – राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आपली पहिली यादी जाहीर केली आहे. अजित पवार यांनी आपल्या पहिल्या यादीत अपेक्षे प्रमाणे बंडात साथ देणाऱ्यांना संधी दिली आहे. मात्र, त्यातील काही मतदारसंघातील उमेदवार वेटिंग लिस्टवर आहेत.अजित पवारांचे विश्वासू समजले जाणारे वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे हे वेटिंग लिस्टवर असल्याने अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. आता, सुनील टिंगरे यांची उमेदवारी जाहीर न होण्यामागील कारण समोर आले आहे.
उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी पत्रकार परिषद घेत यादी जाहीर केली. अजित पवार गटाने आपल्या पहिल्या यादीत 38 उमेदवारांना संधी दिली आहे.
काही दिवसांपूर्वी एबी फॉर्म मिळालेले सुनील टिंगरे यांचे यादीत नाव नसल्याचे समोर आले आहे. तर, नवाब मलिक यांचेही नाव जाहीर करण्यात आले नाही. आजच्या यादीत वडगाव शेरी, शिरूर, फलटण आणि अणुशक्तीनगर या मतदारसंघातील उमेदवार जाहीर करण्यात आले नाही. त्याशिवाय, राष्ट्रवादीचे मुंबईतील संभाव्य उमेदवार झिशान सिद्दिकी यांचेही नाव पहिल्या यादीत नाही. वडगाव शेरीचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांना एबी फॉर्म दिल्याची चर्चा होती. मात्र, त्यांचे नाव जाहीर न झाल्याने आता चर्चांना उधाण आले आहे. पुण्यातील पोर्शे कार हिट अँड रन प्रकरणात सुनील टिंगरे यांनी आरोपीला मदत केली असल्याचा आरोप झाला होता.
वडगाव शेरीतून उमेदवारी का नाही?
वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघावरून वाद सुरू असल्याची माहिती आहे. भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून दावा करण्यात आला आहे. आता, वडगाव शेरी विधानसभेचा वाद दिल्ली दरबारी जाणार आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा आता याबाबत निर्णय घेणार आहेत. अजित पवार, प्रफुल्ल पटेल हे अमित शहा यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचे म्हटले जात आहे. वडगाव शेरी मतदारसंघ हा हक्काचा मतदारसंघ म्हणून हे दोन्ही नेते अमित शहा यांना भेटणार आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुनील टिंगरे आणि नवाब मलिक आणि कुटुंबाला उमेदवारी देण्याच्या विरोधात असून त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आता दोन्ही जागांबाबतचे दोन्ही निर्णय अमित शहांकडे होणार आहे. आज रात्री अजित पवार प्रफुल्ल पटेल अमित शहांच्या भेटीला दिल्लीला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
—– Ganesh Maruti Joshi