HindJagar News – Repoter – Pune – विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून वडगावशेरी मतदार संघात उमेदवारी मिळवण्यासाठी महायुती मधील भारतिय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस या दोन प्रमुख पक्षात जोरदार रस्सीखेच सुरू आहे.भाजपने आपल्या पहिल्या यादीत ९९ जणांना उमेदवारी जाहीर केली, मात्र या यादीत पुण्यातील तीन मतदारसंघातील उमेदवारांची नावे नाहीत, यामुळे या तीनही मतदारसंघातील इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे. यातच वडगाव शेरीच्या जागेसाठी दोन उपमुख्यमंत्र्यांच्या कट्टर समर्थकांमध्ये सुरू असलेल्या तीव्र स्पर्धेमुळे या मतदारसंघात तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. तसेच सोशल मिडियावर चर्चा असली तरी राष्ट्रवादी कडून टिंगरेंच्या नावाची अधिकृत घोषणा नसल्याने सस्पेन्स वाढला आहे.
राष्ट्रवादी कॉँग्रेसचे विद्यमान आमद़ार सुनील टिंगरे आणि भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार जगदीश मुळीक यांच्यात जागा पदरात पाडून घेण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. तर राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने माजी आमदार बापूसाहेब पठारे यांचे तिकीट कन्फर्म झाले आहे. महायुती कडून इच्छुक असलेले आजी – माजी आमदार आपल्या मतांवर ठाम असून या निवडणूकीत जगदीश मुळीक निवडणुकीच्या रिंगणात उतरणारच हे जवळपास निश्चित झाले आहे.
महायुतीमध्ये वडगावशेरीची जागा अजित पवार गटाला जाणार असल्याचे संकेत आहेत. अजित पवार यांनी आपल्याला शब्द दिला असल्याचे टिंगरे सांगत आहेत. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आपला पूर्ण विश्वास असून आपली उमेदवारी पक्की असल्याचे मुळीक सांगत आहेत. त्यामुळे दोन उपमुख्यमंत्री कोणाला उमेदवारी देणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
भाजपचे माजी आमदार मुळीक यांनी निवडणूक लढवायचीच आहे असा निर्धार करून आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. भाजपचे कार्यकर्ते आम्हाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास असल्याचे सांगत आहेत. मुळीक यांनी मतदार संघातील विविध सोसायट्या मध्ये मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवातही केली आहे, कार्यकर्त्यांचे मेळावे, बैठका सुरू आहेत, तसेच सोशल मीडियाद्वारेही मुळीक यांनी प्रचारावर जोर दिलेला दिसत आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवारांना ए, बी फॉर्म दिल्याची चर्चा सोमवारी रंगली असली तरी अधिकृत उमेदवार यादी राष्ट्रवादी कडून जाहीर झालेली नाही. यामुळे वडगाव शेरी मतदारसंघ महायुती मध्ये नेमका कोणत्या पक्षाच्या वाट्याला गेला याचा सस्पेन्स कायम आहे. भाजपचे जगदीश मुळीक यांच्यावतीने निवडणूक लढण्याच्या जोरदार निर्धाराने आणि सुरू असलेल्या दमदार तयारीने या मतदारसंघात तिरंगी लढत होणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे.
—– Ganesh Maruti Joshi.