HindJagar News – Report – Mumbai – शिवडी विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून उमेदवारी नाकारण्यात आलेले लालबागचा राजा सार्वजनिक मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांनी आता आपल्या समर्थकांशी जाहीर संवाद साधायचे ठरवले आहे.
शिवडी विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंचे निष्ठावंत अजय चौधरी आणि सुधीर साळवी यांच्यात उमेदवारी मिळवण्यासाठी चुरस होती. मात्र, गुरुवारी मातोश्रीवर झालेल्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी अजय चौधरी यांच्या बाजूने कौल दिला होता. त्यानंतर सुधीर साळवी हे उद्धव ठाकरे यांना नमस्कार करुन मातोश्रीवरुन बाहेर पडले होते. यानंतर शिवडीतील सुधीर साळवी यांच्या समर्थकांमध्ये नाराजीचे वातावरण होते. यानंतर आता सुधीर साळवी यांनी आपल्या समर्थकांशी जाहीर संवाद साधायचे ठरवले आहे.
सुधीर साळवी यांनी काहीवेळापूर्वीच सोशल मीडियावर एक पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये सुधीर साळवी यांनी आपल्या समर्थकांना साद घातली आहे. ‘माझ्या प्रिय, शिवडी विधानसभेतील निष्ठावंत शिवसैनिकांनो, मला तुमच्याशी बोलायचं आहे!’, असा मजकूर या पोस्टमध्ये लिहला आहे. शुक्रवारी संध्याकाळी 7.30 वाजता लालबाग मार्केटमधील शिवसेना शाखेजवळ सुधीर साळवी हे आपल्या समर्थकांशी जाहीर संवाद साधतील. यावेळी ते नेमका काय निर्णय घेणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
सुधीर साळवी हे लालबागचा राजा सार्वजनिक मंडळाचे मानद सचिव आहेत. गणेशोत्सवाच्या काळात लालबागचा राजाचे दर्शन घेण्यासाठी सेलिब्रिटी, बडे राजकीय नेते आणि उद्योगपतींची रीघ लागलेली असते. या सगळ्यामुळे सुधीर साळवी यांचे बहुतांश राजकीय पक्षांच्या नेत्यांशी उत्तम संबंध आहेत. लालबागचा राजामुळे सुधीर साळवी हे शिवडीत प्रचंड लोकप्रिय आहेत. गेल्या वर्षभरापासून सुधीर साळवी यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी पद्धतशीर प्रयत्न सुरु केले होते. मात्र, उद्धव ठाकरे यांनी संकटकाळात सोबत राहिलेल्या अजय चौधरी यांना झुकते माप दिले होते. त्यामुळे आता सुधीर साळवी वेगळी वाट निवडणार का, अशी चर्चा सुरु झाली आहे. शिवडीत अद्याप महायुतीनेही आपला उमेदवारी जाहीर केलेला नाही. त्यामुळे आता सुधीर साळवी काही वेगळा निर्णय घेऊन उद्धव ठाकरे यांना धक्का देणार का, याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
सुधीर साळवी मातोश्रीशी एकनिष्ठ राहणार?
काल अजय चौधरी यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुधीर साळवी हे उद्धव ठाकरे यांना नमस्कार करुन मातोश्रीवरुन बाहेर पडले होते. त्यानंतर मी संघटनेशी एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. सुधीर साळवी हे लालबागमध्ये आल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी प्रचंड गर्दी केली होती. तेव्हा त्यांनी आपल्या समर्थकांचा राग शांत करण्याचा प्रयत्न केला होता. शिवडी विधानसभेतील पाच पैकी पाच शाखाप्रमुखांनी सुधीर साळवींच्या बाजुनं भूमिका घेतली होती. युवासेना आणि महिला पदाधिकाऱ्यांनी देखील सुधीर साळवींच्या बाजुने कौल दिला होता. त्यामुळे सुधीर साळवी यांनी वेगळा निर्णय घेतल्यास शिवडीची लढाई ठाकरे गटासाठी अवघड होऊ शकते.
Repoter – Anurag Balchandra Salunke.