HindJagar News – Repoter – Pune – राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षातील नेते जोरदार प्रचार करत आहेत. उमेदवारांनी व बंडखोरांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. अर्जांची छाननी सुद्धा झालेली आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकीत बंडखोरी रोखण्यासाठी व नाराजांची नाराजी दूर करण्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. 4 नोव्हेंबर हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. भाजपाकडून शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर केली आहे. या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी भाजपाचे नेते वसंत अमराळे इच्छुक होते. मात्र शिरोळे यांना उमेदवारी दिल्यामुळे अमराळे नाराज झाले होते. भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अमराळे यांची नाराजी नुकतीच दूर केली आहे, अशी माहिती अमराळे यांनी दिली.
2014 च्या विधानसभा निवडणुकीत अमराळे हे निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते तेंव्हा अमराळे यांची भाजप नेत्यांनी मनधरणी केली. तेव्हांही तिकीट नाकारले तसेच 2019 मध्येही भाजप नेत्यांनी त्यांची समजूत काढली होती. दरम्यान यंदाच्या विधानसभेसाठी भाजपने उमेदवारी यादी जाहीर केली या यादीमध्ये नाव येईल अशी अपेक्षा वसंत अमराळे यांना वाटत होती. मात्र पुन्हा एकदा त्यांना डावलून सिद्धार्थ शिरोळे यांना उमेदवारी जाहीर त्यामुळे अमराळे हे पुन्हा एकदा नाराज झाले होते. भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अमराळे यांची नाराजी नुकतीच दूर केली आहे
अमराळे नेमकं काय म्हणाले?
नवराष्ट्रशी बोलताना अमराळे म्हणाले की, मी गेली 23 वर्ष भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी म्हणून काम करत आहे. पुणे शहर उपाध्यक्ष, आणि वीस वर्ष मी शिवाजीनगर मतदारसंघांमध्ये उपाध्यक्ष, सरचिटणीस, चिटणीस या पदांवर काम केले आहे. स्वच्छ चारित्र्य आणि अजात शत्रू या गुणांमुळे शिवाजीनगर भागातील नागरिकांशी माझा कौटुंबिक स्नेह जोडला गेला आहे. या वीस वर्षांमध्ये मी पक्षाच्या कामासोबतच वैयक्तिक खूप कार्यक्रम केलेले आहेत त्यामध्ये 4000 नागरिकांना वेगवेगळे पुरस्कार दिलेले आहेत. 20000 हून अधिक नागरिकांना अल्प दरात संपूर्ण भारतभर व परदेशात देवदर्शन व पर्यटन घडवले आहे. या कामगिरीमुळे श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते मला श्रावणबाळ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. त्यासोबत दरवर्षी हळदीकुंकू, कोजागिरी, महिलांसाठी आरोग्याची व्याख्याने, कीर्तन सप्ताह असे अनेक कार्यक्रम मी या मतदारसंघात केले असल्यामुळे नागरिकांचा मला निवडणूक लढवण्यासाठी मोठा आग्रह होता. परंतु भारतीय जनता पक्षामध्ये प्रथम राष्ट्र नंतर पक्ष आणि नंतर स्वतः अशी शिकवण असल्यामुळे पक्षाच्या वरिष्ठांचा सल्ला मान्य करून मी सिद्धार्थ शिरोळे यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर करत आहे.
लवकरच मी माझ्याशी संबंधित असणाऱ्या प्रतिष्ठित नागरिकांची व वेगवेगळ्या समाजाच्या प्रमुखांची बैठक आयोजित करणार आहे. त्यांच्यासमोर मी माझी भूमिका स्पष्ट करणार आहे. त्यांची आणि सर्वसामान्य नागरिकांची ही समजूत काढणार आहे. व त्यांनाही पक्षाच्या निवडणुकीच्या कामामधे सामील करून घेणार आहे, जे नागरिक मतदारसंघातून स्थलांतरित झालेले आहेत परंतु त्यांचे मतदान शिवाजीनगर मध्ये आहे. अशा नागरिकांच्या गाठीभेटी घेऊन ते मतदानासाठी शिवाजीनगर मध्ये येतील, अशा प्रकारची व्यवस्था लावणार आहे. त्याचप्रमाणे माझ्याशी संबंधित असणाऱ्या कुटुंबीयांचा एक मोठा मेळावाही मी आयोजित करणार आहे. शिरोळे हे दुसऱ्यांदा प्रचंड मताधिक्याने विधानसभेत जाण्यासाठी मी शर्तीचे प्रयत्न करणार आहे.
——- Ganesh Maruti Joshi.