HindJagar News – Repoter – PUNE – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अवघ्या १५ दिवस आधी राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्याच आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने यासंदर्भातले आदेश जारी केले असून त्यांना तातडीने पदरचनेतील त्यांच्यानंतरच्या सर्वात वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडे पोलीस महासंचालकपदाचा कार्यभार सोपवण्याचे आदेश देण्यासंदर्भात निवडणूक आयोगाने राज्याच्या मुख्य सचिवांना निर्देश दिले आहेत.यानंतर मुख्य सचिवांनीदेखील तीन वरीष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या पॅनला नव्या पोलीस महासंचालकांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. एएनआयनं सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे.
कशी असेल नव्या नियुक्तीची प्रक्रिया?
रश्मी शुक्लांच्या बदली आदेशांनंतर आता नव्या पोलीस महासंचालकांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मुख्य सचिवांच्या आदेशांनुसार, तीन वरीष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांचं पॅनल गठित करून त्यांच्याकडे नव्या नावाबाबतचा अहवाल तयार करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हे पॅनल आपला अहवाल राज्य सरकारला सादर करेल. त्यानंतर हा अहवाल केंद्रीय निवडणूक आयोगाला दिला जाणार असून त्यानंतर नव्या पोलीस महासंचालकांच्या नावाची घोषणा केली जाईल. आज संध्याकाळपर्यंत ही घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रश्मी शुक्ला विरोधकांच्या टीकेच्या केंद्रस्थानी!!!!
राज्यात सध्या विधानसभा निवडणुकांची धामधूम चालू असताना दुसरीकडे रश्मी शुक्ला यांच्या बदलीच्या आदेशांमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून विरोधकांकडून रश्मी शुक्लांना व त्यांच्या अनुषंगाने राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं जात होतं.रश्मी शुक्ला यांच्यावर याआधीही देवेंद्र फडणवीसांच्या आदेशांनी विरोधकांचे फोन टॅप केल्याचे आरोप करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांत संजय राऊत, नाना पटोले व इतर विरोधी नेत्यांकडून अजूनही फोन टॅपिंग केले जात असल्याचे आरोप रश्मी शुक्लांवर केले होते. त्यानंतर आता त्यांच्या बदलीचे आदेश निवडणूक आयोगाने जारी केल्यामुळे त्यावरून राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
निवडणूक आयुक्तांनी दिले होते संकेत?
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करताना केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी रश्मी शुक्लांबाबतच्या प्रश्नावर अशा कारवाईसंदर्भात संकेत दिले होते. त्यावेळी रश्मी शुक्लांबाबत बोलताना ‘यासंदर्भात योग्य तो तपास करून निर्णय घेतला जाईल’, असं राजीव कुमार म्हणाले होते. त्यानंतर आज केंद्रीय निवडणूक आयोगाने जारी केलेल्या आदेशांचं विरोधी पक्षांकडून स्वागत केलं जात आहे.
——– Ganesh Maruti Joshi.