HindJagar News – Repoter – PUNE – राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराला सुरूवात झाली. सोमवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यानंतर सर्व पक्षांकडून जोरदार प्रचारसभा सुरू झाल्या. या निवडणुकीमध्ये काही पक्षांतील नेत्यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज केला.काहींनी उमेदवारी अर्ज मागे घेत इतर पक्षांच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचे ठरवले आहे.
अशामध्ये पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. स्वबळावर विधानसभा निवडणूक लढणाऱ्या मनसेच्या पुण्यातील कार्यकर्त्यांनी इतर उमेदवारांना पाठिंबा दिल्याची बातमी समोर आली आहे. या कार्यकर्त्यांविरोधात पक्ष कारवाई करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात मनसेकडून स्थानिक पातळीवर काही अपक्ष आणि अन्य पक्षांच्या अधिकृत उमेदवारांना पाठिंबा देण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. याची दखल पक्षाच्या नेत्यांनी घेतली असून परस्पर असे निर्णय जाहीर करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. विधानसभा निवडणूक मनसेकडून स्वबळावर लढविली जाणार आहे.
मनसेने या विधानसभा निवडणुकीमध्ये पुण्यातील चार मतदारसंघांसह राज्यातील अनेक मतदारसंघांत उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. महत्वाचे म्हणजे राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे विधानसभा निवडणूक लढवत आहेत. स्वबळावर निवडणूक लढविण्यात येत असल्याने कोणत्याही अपक्ष किंवा पक्ष आणि संघटनेच्या उमेदवारास मनसेकडून अधिकृत पाठिंबा देण्यात आलेला नाही.
असे असताना काही ठिकाणी स्थानिक पातळीवर पक्षाकडून पाठिंबा देण्यात आल्याची बाब पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आढळून आली आहे. अशातच परस्पर निर्णय जाहीर करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे मनसे नेते अनिल शिदोरे आणि राजेंद्र उर्फ बाबू वागसकर यांनी जाहीर केले आहे.
——– Ganesh Maruti Joshi.