HindJagar News – Repoter – PUNE – विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून काँग्रेसचा पंजा हे चिन्हच गायब झालं आहे, कारण उमेदवारी अर्ज मागे घ्यायच्या शेवटच्या दिवशी मधुरिमाराजे यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसने विद्यमान आमदार जयश्री जाधव यांचं तिकीट कापून राजेश लाटकर यांना उमेदवारी दिली होती, पण अवघ्या काही तासात राजेश लाटकर यांची उमेदवारी रद्द करून मधुरिमाराजे यांना काँग्रेसने तिकीट दिलं.
उमेदवारी अर्ज माघारीसाठी अवघ्या काही मिनिटांचा कालावधी बाकी असताना मधुरिमाराजे यांनीच कोल्हापूर उत्तरच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे एक प्रकारे कोल्हापूर उत्तरच्या राजकारणाला पुन्हा एकदा कलाटणी मिळाली आहे. मधुरीमाराजे यांचा अर्ज मागे घेताच सतेज पाटील भडकल्याचं समोर आलंय. शाहू महाराज आणि सतेज पाटलांमध्ये मधुरिमाराजेंच्या उमेदवारांवरून वाद झाला आहे.
सतेज पाटील संतापले
मधुरिमाराजे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे कोल्हापूर उत्तरमधून काँग्रेसवर मोठी नामुष्की ओढावली. यानंतर काँग्रेस नेते सतेज पाटील चांगलेच संतापले. दम नव्हता तर उमेदवारी कशाला घेतली? लढायचं नव्हतं तर उमेदवारी का घेतली, मी माझी ताकद दाखवून दिली असती, असं सतेज पाटील शाहू महाराजांना म्हणाले.
काय म्हणाले शाहू महाराज?
लाटकर हे पक्षातील महत्त्वाचे पदाधिकारी आहेत. त्यांची नाराजी पक्षाला परवडणार नाही, असे सांगून मधुरीमाराजे यांनी माघार घ्यायचा निर्णय घेतला, अशी प्रतिक्रिया शाहू महाराजांनी दिली आहे.
कोण आहेत मधुरिमाराजे छत्रपती?
मधुरिमा राजे छत्रपती यांना राजकारणाचं बाळकडू घरातूनच मिळालं आहे. आता जरी मधुरिमाराजे या छत्रपती घराण्याच्या सून असल्या तरी दिवंगत माजी मंत्री दिग्विजय खानविलकर यांच्या त्या कन्या आहेत. त्यामुळे अगदी लहानपणापासूनच त्यांना राजकीय वारसा मिळालाय. त्यांनी दिग्विजय खानवीलकर यांची राजकीय कारकीर्द जवळून बघितली आहे. आणि छत्रपती घराण्यात आल्यानंतर त्यांचा सार्वजनिक वावर आणि प्रचंड दांडगा जनसंपर्क याच्यामुळे सातत्याने विधानसभेत त्यांचं नाव चर्चेत येत होतं.
माहेरचा अन् सासरचा वारसा..
मधुरिमाराजे छत्रपती यांना दिवंगत माजी मंत्री दिग्विजय खानविलकर यांचा वारसा आणि छत्रपती घराण्याचा राजकीय वारसा लाभलाय. दिवंगत मंत्री खानविलकर यांना मानणारा एक मोठा गट आहे. त्यासोबतच छत्रपती घराण्याला मानणारा मोठा गटही कोल्हापुरात आहे. छत्रपती घराण्यातील मालोजीराजे छत्रपती यांच्या त्या पत्नी आहेत. मालोजीराजेही कोल्हापुरातील विविध संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सक्रीय असतात.
मधुरिमाराजे यांनी सक्रीय राजकारणात यावं यासाठी त्यांचे समर्थक गेल्या 20 वर्षांपासून प्रयत्न करत होते, यानंतर मधुरिमाराजे यांना उमेदवारीही मिळाली, पण त्यांनी अखेरच्या क्षणी माघार घेतल्यामुळे कोल्हापूर उत्तर मतदारसंघात नवा ट्विस्ट आला आहे.
——– Ganesh Maruti Joshi.