HindJagar News – Repoter – PUNE – विधानसभा निवडणुकीमध्ये शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये कसबा पेठ मतदारसंघामध्ये सर्वाधिक 58.76 टक्के मतदान झाले. तर सर्वांत कमी 50.90 टक्के मतदान शिवाजीनगर मतदारसंघात झाले.त्यामुळे मतदानाचा वाढलेला टक्का कोणाला तारणार हे 23 नोव्हेंबर रोजी दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे. शहरात वाढलेल्या मतदानाचा आम्हालाच फायदा होणार असल्याचा दावा महायुती आणि महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहे.
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी गेली दोन आठवडे सुरू आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर शहरातील आठ विधानसभा मतदारसंघात 121 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.
उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राजनाथ सिंग, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे, इमरान प्रतापगडी, सचिन पायलट, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्यासह केंद्रीय मंत्री, केंद्रीय राज्यमंत्री, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभांचे विरोधी पक्षनेते, माजी मंत्री, विविध नेत्यांनी हजेरी लावली.
सभा, पदयात्रा, रॅल्यांच्या माध्यमातून उडलेला प्रचाराचा धुराळा सोमवारी सायंकाळी सहा वाजता शांत झाला. त्यानंतर शहरातील आठही मतदारसंघातील तीन हजार 40 मतदान केंद्रांवर बुधवारी सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये सर्वाधिक मतदान कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात, तर सर्वांत कमी मतदान शिवाजीनगर मतदारसंघात झाले.
शहरातील आठही मतदासंघात सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली. सोसायटीच्या तुलनेत मध्यवस्तीत आणि झोपटपट्टी असलेल्या भागातील मतदान केंद्रावर जास्त गर्दी होती. सोसायटी परिसरात दुपारपर्यंत जास्त मतदान झाले होते. तर झोपडपट्टी भागातील मतदान केंद्रावर दुपारी 3 नंतर वाढले.
पूर्नचनेनंतर 2009 मध्ये विधानसभेची पहिली निवडणूक घेण्यात आली. या निवडणूकीत शहरातील 8 मतदासंघापैकी एकाही मतदारसंघात 50 टक्यांपेक्षा जास्त मतदान झाले नव्हते. त्या निवडणूकीत सर्वाधिक मतदान 49.37 टक्के खडकवासला मतदारसंघातून तर सर्वात कमी 35.93 टक्के मतदान पुणे कॅन्टोंन्मेंट मतदारसंघात झाले होते.
तर पुढच्या म्हणजेच 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीत शहरातील आठ मतदारसंघापैकी सात मतदारसंघात 50 टक्यांपेक्षा जास्त मतदान झाले होते. यानंतर 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निडणूकीत परत मतदानाची टक्केवारी घटली होती. खडकवासला आणि कसबा मतदारसंघ वगळता सगळ्या शहरातील 6 मतदारसंघात 50 टक्यांपेक्षा मतदान कमी झाले.
महत्वाच म्हणजे 2009, 2014 आणि 2019 मधील तीनही विधानसभा निवडणूकीत पुणे कॅन्टोंन्मेंट मतदारसंघात मतदानाच्या टक्केवारीत सगळ्यात तळाला राहिला होती. मात्र यंदा पहिल्यांचा पुणे कॅन्टोंन्मेंट मतदारसंघात 50 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाल्याचे पाहायला मिळाले. शहरातील आठही मतदारसंघात मतांच्या टक्केवारीत वाढ झाली असून ती वाढ कोणाच्या फायद्याची ठरणार आहे हे 23 नोव्हेंबर रोजी स्पष्ट होईल.
——– Ganesh Maruti Joshi.