हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – Delhi – सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी दिल्ली हायकोर्टाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या सरकारी निवासस्थानी सापडलेल्या नोटांच्या चौकशीसाठी समिती स्थापन केली आहे.तीन न्यायमूर्तींची समिती स्थापन करण्यात आली असून या प्रकरणी न्या. यशवंत वर्मा यांची चौकशी होईल. नवी दिल्ली हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश डी.के. उपाध्याय यांच्याकडून सादर करण्यात आलेल्या अहवालानंतर सुप्रीम कोर्टानं हा निर्णय घेतला आहे.
सुप्रीम कोर्टाकडून पहिल्यांदा कागदपत्रे सार्वजनिक
सुप्रीम कोर्टानं नागरिकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास कायम रहावा म्हणून आणि पारदर्शकता राखण्यासाठी न्या. यशवंत वर्मा यांच्या घरी लागलेल्या आगीत जळालेल्या नोटांच्या प्रकरणातील सर्व कागदपत्रे सार्वजनिक केली आहेत. सुप्रीम कोर्टानं शनिवारी रात्री उशिरानं त्यांच्या वेबसाईटवर कागदपत्रं सार्वजनिक केली. सुप्रीम कोर्टाच्या इतिहासात हे पहिल्यांदा घडलं आहे की एखाद्या न्यायमूर्तीच्या विरोधातील आरोपांच्या चौकशीसाठीची सर्व कागदपत्रं सार्वजनिक करण्यात आली.
कामापासून दूर राहण्याचे आदेश
सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी दिल्ली हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश डी.के. उपाध्याय यांना आदेश देत म्हटलं की न्या. यशवंत वर्मा यांना न्यायदानाच्या कामापासून दूर ठेवण्यात यावं. सुप्रीम कोर्टानं या संदर्भातील एक प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे. सरन्यायाधीशांनी या प्रकरणी तीन सदस्यांची समिती स्थापन केली आहे. या समितीत पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश शील नागू, हिमाचल हायकोर्टाचे मुख्य न्यायधीश जी. एस. संधावालिया आणि कर्नाटक हायकोर्टाचे न्यायाधीश अनू शिवरमन यांचा समावेश आहे.
दिल्ली हायकोर्टाच्या रिपोर्टनंतर कारवाई
दिल्ली हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश डी.के. उपाध्याय यांनी त्यांचा चौकशी अहवाल सरन्यायाधीश संजीव खन्ना योंना सोपवला होता. हा अहवाल शुक्रवारी सोपवण्यात आला होता. न्या.यशवंत वर्मा यांची बाजू देखील यामध्ये मांडण्यात आली आहे.
दिल्ली हायकोर्टाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या दिल्लीतील शासकीय निवासस्थानी 14 मार्चला आग लागली होती. त्यावेळी न्या. यशवंत वर्मा दिल्लीत नव्हते. आगीच्या घटनेनंतर सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजियमकडून न्या. वर्मांची बदली अलहाबाद हायकोर्टात केली गेली होती. या मुद्यावर देशभरात आणि संसदेत देखील चर्चा झाली होती. दिल्ली अग्निशमन सेवा दलाच्या प्रमुखांनी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना रोख रक्कम सापडली नसल्याचं म्हटलं होतं. मात्र, त्यांनी याप्रकरणी पुन्हा यूटर्न घेत असं वक्तव्य केलं नसल्याचं म्हटलं.
रिपोर्टमधील प्रमुख मुद्दे
1. न्या. वर्मांच्या सरकारी निवासस्थानी जळालेल्या अवस्थेत नोटा सापडल्या.
2. दिल्ली हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांकडून सखोल चौकशीची गरज व्यक्त करण्यात आली.
3. न्या. वर्मा यांचं गेल्या 6 महिन्यांचं कॉल रेकॉर्ड तपासलं जाणार
=== पी.एस.सूर्यवंशी.
( हिंदजागर न्यूज, पुणे. )