हिंदजागर विशेष – पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत दीर्घ काळापासून प्रवेश करण्यासाठी आकारले जाणारे वाहन प्रवेश शुल्क अखेर रद्द करण्याचा आदेश बुधवारी संरक्षण मंत्रालयाने दिला आहे. राजपत्रित आदेशाद्वारे पुणे कँटोन्मेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुब्रत पाल यांना वाहन प्रवेश शुल्क रद्द करून, त्याची आकारणी थांबवण्याचा आदेश दिला.
पुणेकर नागरिकांची व्यावसायिक वाहने आता कँटोन्मेंटच्या हद्दीत विनाशुल्क प्रवेश करू शकणार आहेत. पुणे कँटोन्मेंट प्रशासनाशी याबाबत संपर्क साधला असता, अजून आम्हाला आदेश प्राप्त झाले नाहीत, असे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. यापूर्वी संरक्षण मंत्रालयाने वाहन प्रवेश शुल्क रद्द करण्याची सूचना दिली होती. मात्र, कँटोन्मेंटला मिळणारे उत्पन्न पाहता बोर्डाच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी हे शुल्क रद्द केले जाणार नाही, असा पवित्रा घेतला होता. त्यानंतर दोन वर्षे शुल्क आकारणी सुरूच राहिली. अखेर आता बुधवारी पुन्हा एकदा शुल्क रद्द करण्याचा आदेश काढण्यात आला. हा आदेश कँटोन्मेंट प्रशासनाला मान्य करावा लागणार आहे.
कँटोन्मेंटला २०१९पूर्वी दर वर्षी १० ते १०.५ कोटी रुपयांचे उत्पन्न वाहन प्रवेश शुल्काच्या आधारे मिळत होते. ‘जीएसटी’मुळे ‘एलबीटी’ रद्द झाल्याने मिळकत कर आणि वाहन प्रवेश शुल्क या दोन प्रकारच्या उत्पन्नावरच कँटोन्मेंटची भिस्त होती. त्यामुळे २०१९मध्ये वाहन प्रवेश शुल्कामध्ये आणखी वाढ करण्याचा निर्णय घेतला गेला. यातून वर्षाकाठी कँटोन्मेंट प्रशासनाला १५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळू लागले. आता मात्र हे शुल्क रद्द करण्यात आले आहे.नागरिकांना मोठा दिलासा व्यावसायिक वाहतूक करणाऱ्या प्रवासी कॅब, मालवाहतूक करणारे टेम्पो, ट्रकवर दरमहा हजारो रुपये शुल्कापोटी खर्च करावे लागत होते. हे शुल्क रद्द करण्याची मागणी वाहतूक संघटनांकडून केली जात होती. या नागरिकांना आता दिलासा मिळणार आहे.
अशी होते शुल्काची वसुली वाहनांचा प्रकार कर (रुपयांत) 1) खासगी प्रवासी बस – 70 2) मालवाहतूक ट्रक – 100 3) प्रवासी मोटारी – 50 4) मालवाहतूक रिक्षा व रिक्षा-टेम्पो – 50 5) मालवाहतूक ट्रॅक्टर व ट्रक – 30.
कँटोन्मेंटचे अधिकारी ‘नॉट रिचेबल’
वाहन प्रवेश शुल्क रद्द करण्याचा निर्णय संरक्षण मंत्रालयाने जाहीर केल्यानंतर हा निर्णय अद्याप आमच्यापर्यंत आला नसल्याचे कँटोन्मेंटच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. कँटोन्मेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुब्रत पाल यांच्याशी वारंवार संपर्क करूनही त्यांच्याशी संपर्क झालेला नाही. त्यामुळे वाहन प्रवेश शुल्काच्या मुद्द्यावरून मुख्य कार्यकारी अधिकारी ‘नॉट रिचेबल’ असल्याने आणखी गोंधळ निर्माण झाला आहे.
- श्री.शैलेश बाळासाहेब हेंद्रे ( विशेष वार्ताहर )