हिंदीजागार प्रतिनिधी – ‘काय झाडी, काय डोंगार, काय हॉटेल..’ या डायलॉगमुळे प्रसिद्ध झालेले सांगोल्याचे आमदार आपल्या वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असतात. राज्यात सध्या राजकीय वातावरण तापलेले असताना शहाजी बापू पाटील यांनी नवीन गौप्यस्फोट केला आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी माझ्यासह शिवसेनेच्या 40 आमदारांचे मतदारसंघ धोक्यात आणण्याचे काम सुरू केले होते, असा गंभीर आरोप आमदार शहाजी बापू पाटील यांनी केला आहे. सांगोला येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते. पाटलांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
आमदार शहाजी बापू पाटील?
आमदार शहाजी बापू पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांच्याकडून झालेल्या हालचालींचा मोठा गौप्यस्फोट केला आहे. “माझ्यासह आमदार महेंद्र दळवी, थोरवे, योगेश कदम, अनिल बाबर, प्रकाश आबिटकर यांच्यासह 40 जणांचे मतदार संघ धोक्यात आणायचे काम काँग्रेस राष्ट्रवादीकडून सुरू होते. पराभूत उमेदवाराच्या पत्रावर निधी देऊ लागले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सांगण्यावरून उद्धव ठाकरेंनी माझं तिकीट देखील कापण्याचे तयारी केली होती. मात्र, आता शिंदे फडणवीस सरकारच्या काळात रेकॉर्ड ब्रेक निधी मिळत आहे. सांगोला आता बारामतीची स्पर्धा करणार आहे,” असा दावा शहाजी बापू पाटील यांनी केला आहे.
- श्री.गणेश मारुती जोशी ( स्थानिक प्रतिनिधी )