हिंदजागर प्रतिनिधी – गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण वेगवेगळ्या तर्क वितर्कांनी चांगलंच ढवळून निघालं आहे. महाराष्ट्रात लवकरच राजकीय भूकंप होणार अशी चर्चा सुरू आहे. दरम्यान, आता राष्ट्रवादीचे बीडचे आमदार प्रकाश सोळुंके यांनी सुद्धा एक मोठं विधान केलं आहे. महाराष्ट्रात लवकरचं राजकीय भूकंप होणार आहे. सध्या जी चर्चा सुरू आहे ते नक्की होणारचं आहे, त्याच्याबद्दल कोणी शंका आणू नये, असं सोळुंके यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळुंके यांनी बीड माजलगावमध्ये जाहीर पत्रकार परिषद घेतली. या पत्रकारपरिषदेत त्यांनी राज्याच्या राजकीय परिस्थितीबाबत मोठी विधानं केली आहे.
“राज्यातील पुढच्या निवडणुका जिंकण्यासाठी भाजपला काही ना काही चमत्कार करावा लागणार आहे. सध्या राज्यात जी चर्चा सुरू आहे, ते होणारचं आहे, त्यांच्याबद्दल कुणीही मनामध्ये शंका आणू नये , मी गेल्या 15 दिवसांपासून मुंबईला गेलो नाही, माझी कुणाशी चर्चा झाली नाही. परंतु 35 वर्षाच्या राजकारणानंतर, राजकारणाचं काय होणं अपेक्षित आहे ? याची जाण मला आहे. म्हणून मी स्टेटमेंट दिलं. मात्र निश्चितचं काही ना काही भूकंप नक्कीच होण्याची परिस्थिती आहे”, असंही सोळुंके म्हणाले.
पुढे बोलताना सोळुंके म्हणाले, दुर्दैवाने महाराष्ट्रात आज परिस्थिती अशी निर्माण झाली आहे, स्थिर राज्य आणि पुढच्या निवडणुका जिंकण्यासाठी भाजपला असा काहीना काही चमत्कार महाराष्ट्रात करावा लागणार आहे. दरम्यान या अगोदरही प्रकाश सोळुंके हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा होती. मात्र आता पुन्हा एकदा राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य करत त्यांनी एक प्रकारे राज्यात पुढच्या काही दिवसात, मोठ्या राजकीय घडामोडी होण्याचे संकेत दिले आहेत.
- श्री.विनोद वाघमारे ( प्रतिनिधी )