हिंदजागर प्रतिनिधी – एका अल्पवयीन शाळकरी मुलीवर दोन नराधमांकडून अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली. या दोघांनाही पौड पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीमध्ये एका पंचाहत्तर वर्षांच्या वयस्कर व्यक्तीचा समावेश आहे.अनंत ऊर्फ चिकू संतू लांडगे (वय ७५ ) आणि अनिल ऊर्फ खंड्या सिद्धू ठोंबरे (वय ३२) या दोघांनी एका अल्पवयीन शाळकरी मुलीला चाॅकलेट आणि पैशांचे आमिष दाखवून गेली तीन ते चार महिने अत्याचार केल्याचे प्रकरण उघडकीस आले. घडलेल्या या घटनेबद्दल कोणालाही सांगितले, तर मारून टाकू, अशी धमकी त्या मुलीला या दोघांनी दिली होती. नातेवाइकांना शंका आल्यामुळे या मुलीला नातेवाइकांनी घडलेल्या घटनेबद्दल सखोल विचारले असता, अनंत लांडगे याने अत्याचार केल्याचे समजले. तसेच, अजून सखोल चौकशी केली असता, अनिल ठोंबरे यानेही काही दिवसांपूर्वी तिच्यावर अत्याचार केल्याचे समजले. यामुळे नातेवाईक आणि पीडित मुलगी यांनी रविवारी ( दि.२३) रात्री अकरा वाजता पौड पोलीस ठाण्यात याची फिर्याद दिली. याबाबतचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण हे करीत आहेत.
- श्री.गणेश मारुती जोशी ( प्रतिनिधी )