हिंदजागर प्रतिनिधी – ‘लोक माझा सांगाती’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या दिवशी राष्ट्रवादीचे सर्वसर्वा शरद पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. कुठे थांबायचं हे मला कळतं, म्हणून एनसीपीच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होणार असल्याची घोषणा यावेळी शरद पवार यांनी केली. त्यांच्या या घोषणेनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. यानंतर आता नवा अध्यक्ष कोण होणार यावरुन चर्चांना उधाण आलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या दुसऱ्या भागाचे आज प्रकाशन झाले. या पुस्तकात शरद पवार यांनी अनेक खळबळजनक खुलासे केल्याची चर्चा आहे. या सोहळ्यात शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेमुळे कार्यकर्त्यांना धक्काच बसला आहे.
यावेळी शरद पवार म्हणाले की, 1967 साली पासुन माझा राजकीय प्रवास सुरु झाला. महाराष्ट्राच्या जनतेने मला पराभवाचा रस्ता कधी ही दाखविला नाही. कुठे थांबायचं हे मला कळतं, म्हणून एनसीपीच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होणार आहे. राज्यसभेची टर्म संपल्यानंतर पुन्हा निवडणुकीला उभं राहणार नाही. नवी जबाबदारी नको. नवा अध्यक्ष कोण हे पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी ठरवावं, असंही ते यावेळी म्हणाले. शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर राष्ट्रवादीचा पुढील अध्यक्ष कोण होणार यावरुन चर्चेला उधाण आलं आहे. मात्र अद्यापही कोणाच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाही.
शरद पवारांच्या पुस्तकात खळबळजनक खुलासे…
2019 च्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत नव्हते. तेव्हा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केले होते. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. या शपथविधीमागे शरद पवारांचाच हात आहे, अशी चर्चा सुरू होती. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील अप्रत्यक्षरित्या पहाटेच्या शपथविधीमागे शरद पवार यांचा हात असल्याचं वक्तव्य केलं होतं. यामुळे चर्चेला उधाण आलं. शरद पवार यांनी मात्र याबाबत कधीच कोणती प्रतिक्रिया दिली नाही. परंतु आता त्यांनी आपल्या पुस्तकात याबाबत खुलासा केला आहे. अजित पवारांचा पहाटेचा शपथविधी समजल्यावर धक्का बसल्याची कबुली शरद पवार यांनी आपल्या लोक माझे सांगती पुस्तकाच्या दुसऱ्या भागात दिली आहे.