हिंदजागर प्रतिनिधी – केवळ महाराष्ट्र स्टेट ओपन स्कूल स्थापन केले. त्या माध्यमातून दहावीचीच नव्हे, तर आरोपींनी वेगवेगळे सहा बोर्ड आणि विद्यापीठे स्थापन करून तब्बल 2 हजार 739 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 35 ते 80 हजार रुपयांपर्यंत बोगस प्रमाणपत्रे वाटल्याचा धक्कादायक प्रकार तपासात समोर आला आहे.याप्रकरणात चौघांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यातील मुख्य आरोपीच्या चौकशीतून महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे.
सय्यद इम्रान सय्यद इब्राहिम (वय-38, रा. छत्रपती संभाजीनगर) हा बोगस प्रमाणपत्र वाटपातील म्होरक्या आहे. त्याच्या ताब्यातून जप्त केलेला लॅपटॉप व मोबाईलमधून धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. सय्यद याने 2019 पासून गुगलवर याच धर्तीवर ‘महाराष्ट्र स्टेट ओपन स्कूल’ (एमएसओएस) ही नावात बदल करून स्वत:ची बेकायदेशीर वेबसाईट सुरू केली. सदर ओपन स्कूलला फी आकारण्याचा किंवा परीक्षा घेण्याचा अधिकार नसताना, आरोपीने स्वयंसेवी संस्थांची मान्यता घेत परस्पर विद्यार्थ्यांना फी आकारण्यासोबत परीक्षा घेण्याचे आश्वासन देत प्रमाणपत्र देण्याचे मान्य केले.
त्या आधारे त्याने हजारो विद्यार्थ्यांकडून 35 हजार ते 80 हजारांपर्यंत मोठ्या रकमा स्वीकारल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तो केवळ दहावीची प्रमाणपत्रे देण्यावरच थांबला नाही. त्याने महाराष्ट्र स्टेट ओपन स्कूल (एमएसआएस) च्या नावाने दहावी आणि बारावीची 741 प्रमाणपत्रे आर्थिक व्यवहार करून वाटली. अॅमडस विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर नावाने बी. एस्सी., बी. कॉम., बी. ए.ची 626 प्रमाणपत्रे, महाराष्ट्र बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन एक्झामिनेशन (एमबीटीईई) (आयआयटी) संभाजीनगर हे विद्यापीठ स्थापन करून डिप्लोमा, आयटीआय, इंजिनिअरिंगची 630 प्रमाणपत्रे वाटली.तर दहावी-बारावीकरिता त्याने बोर्ड ऑफ सेंकडरी एज्युकेशन मराठवाडा छत्रपती संभाजीनगर या बोर्डाच्या नावाने 733 प्रमाणपत्रे, महाराष्ट्र राज्य मुक्त विश्वविद्यालय संभाजीनगरच्या नावाने बी. एस्सी., बी. कॉम., बी. ए.ची पाच, तर अलहिंद युनिव्हर्सिटी संभाजीनगरच्या नावाने बी. एस्सी., बी. कॉम., बी. ए.ची 4 बोगस प्रमाणपत्रे पैसे घेऊनवाटल्याचा धक्कादायक प्रकार निष्पन्न झाला आहे.
दहा कोटींहून अधिक व्यवहारांची शक्यता
सय्यद याने बोगस प्रमाणपत्रे देण्यासाठी टक्केवारीनुसारी प्रमाणपत्रांची किंमत ठरविल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्याने 35 टक्के असलेल्याला 35 हजार, 70 टक्के हवे असलेल्या विद्यार्थ्याला 70 हजार रुपये घेतले असून, ही फसवणुकीची रक्कम दहा कोटींच्यावर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार सय्यद याचे शिक्षण एमबीए, आयटीपर्यंत झाले आहे. त्याने युट्यूबच्या माध्यमातून बनावट प्रमाणपत्रे कशी बनवायची याची माहिती अवगत करून विविध विद्यापीठे, बोर्ड स्थापन केली. याद्वारे त्याने दहावी, बारावी, बी. एस्सी., डिप्लोमा, आयटीआय, इंजिनिअरिंग शाखेची बोगस प्रमाणपत्रे वाटल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्याच्या लॅपटॉपमधून आतापर्यंत 2700 हून अधिक जणांची यादी मिळाली आहे. त्या अनुषंगाने आमचा तपास सुरू आहे. – अमोल झेंडे, पोलिस उपायुक्त गुन्हे.
- श्री.गणेश मारुती जोशी ( प्रतिनिधी )