हिंदजागर प्रतिनिधी – जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी राष्ट्रवादी फुटीनंतर तटस्थ राहण्याची भूमिका घेतली असली तरी जुन्नरमध्ये माझा शब्द डावलला जात नाही. त्यामुळे अतुल बेनके यांना तालुक्यातील ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांना योग्य तो सल्ला दिला असल्याचे जेष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.आगामी विधानसभा निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार), शिवसेना उध्दव ठाकरे आणि काँग्रेस एकत्र लढणार आहोत. यामध्ये जुन्नर विधानसभेची जागा माझ्या राष्ट्रवादी काँग्रेसला राहणार असल्याचे मी आज येथे स्पष्ट करतो असेही पवार म्हणाले.राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये फुट पडल्यापासून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार जुन्नर – आंबेगाव मध्ये सभा घेणार असल्याचे बोलले जात होते. अखेर पवार जुन्नर तालुक्यात आदिवासी चौथरा अभिवादन दिनानिमित्त मेळाव्यासाठी आज रविवारी आले. जुन्नर येथील सभेपूर्वी विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या घरी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. खासदार डाॅ. अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके यांच्यासह तालुक्यातील सर्व ज्येष्ठ नेते यावेळी उपस्थित होते.
चिन्हाला फार महत्त्व देत नाही
राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्हाचे देखील उध्दव ठाकरे यांच्या प्रमाणे होणार का याबाबत पवार म्हणाले की, काँग्रेसला सुरूवातील काही वर्षे प्रत्येक निवडणुकीत वेगवेगळी चिन्ह होती तरी बहुमताने निवडून आलो. त्यामुळे चिन्हाला तसे फारसे महत्त्व मी देत नाही, पण राज्याला आणि देशाला माहिती आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष कोण आहेत.दरम्यान इंडीया आघाडीची पहिली सभा मध्यप्रदेशात व्हावी असा माझा प्रयत्न. मात्र आघाडीतील काहींची वेगळी भुमिका आहे. या संदर्भात आठ दिवसांत निर्णय घेण्यात येईल असे देखील पवार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
== श्री.गणेश मारुती जोशी ( प्रतिनिधी )