हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – पुणे जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उत्तर पुणे जिल्हा अध्यक्ष प्रभाकर बांगर यांच्यावर अज्ञात दहा ते बारा तरुणांनी हल्ला करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना सोमवारी (दि2) सकाळी 10 च्या सुमारास एकलहरे (ता. आंबेगाव) येथे घडली आहे. बांगर यांच्यावर मंचर उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहेत.याबाबत प्रभाकर बांगर यांनी पत्रकाराशी बोलताना सांगितले की, ते आणि त्यांचे सहकारी वनाजी बांगर हे विघ्नहर सहकारी साखर कारखाना येथे ऊस दराबाबत बैठक असल्याने सकाळी दुचाकीवर जुन्नर येथे जाण्यासाठी निघाले होते.दहाच्या सुमारास दहा ते बारा तरुणांनी त्यांचा पाठलाग करत त्यांना एकलहरे येथे थांबवून रस्त्याच्या बाजूला नेऊन तरुणांनी मंत्री दिलीप वळसे पाटील आणि देवेंद्र शहा यांच्या विरोधात बोलतो का, असे म्हणत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.यावेळी प्रभाकर बांगर यांचा वैद्यकीय तपासणीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे यांनी सांगितले.
=== गणेश मारुती जोशी ( स्थानिक वार्ताहर )