हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – गणेश विसर्जन मिरवणुकीतील लेझर बीममुळे अनेकांच्या डोळ्यांना इजा झाल्याचे समोर आले आहे. पुण्यात लेझर बीममुळे नेत्रपटलाला इजा झाल्याची सुमारे १५ प्रकरणे समोर आली आहेत. त्यातील काही गंभीर असून, संबंधितांची दृष्टी कायमस्वरूपी जाण्याचा धोका आहे, अशी माहिती नेत्रतज्ज्ञांनी दिली.यंदा विसर्जन मिरवणुकीदरम्यान अनेक गणेश मंडळांनी रथावर लेझर बीमचा वापर केला होता. त्याच्या प्रखर झोतामुळे डोळ्यांना इजा झाल्याच्या तक्रारी घेऊन अनेक तरुण मागील काही दिवसांत नेत्रविकार तज्ज्ञांकडे येत आहेत. पुण्यातील नेत्र रुग्णालयांमध्ये अशा सुमारे १५ हून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. त्यांपैकी एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालयात चार रुग्णांची नोंद झाली आहे. ससून सर्वोपचार रुग्णालयात दोन, डॉ. दूधभाते नेत्रालयात दोन, तर शहरातील इतर खासगी रुग्णालयांमध्ये सात रुग्णांची नोंद झाली आहे.
लेझर बीममुळे डोळ्यांना त्रास झालेले तरुण प्रामुख्याने २० ते २५ वयोगटातील आहेत. मिरवणुकीत लेझर बीमच्या जवळ असलेल्या तरुणांना प्रामुख्याने त्रास झाला आहे. लेझर बीम डोळ्यावर पडल्यानंतर अचानक कमी दिसू लागते. यामुळे कामस्वरूपी डोळ्याला इजा होण्याचा धोका आहे. – डॉ. अंजली कुलकर्णी, जिल्हा नेत्र शल्यचिकित्सकलेझर बीम हा तीव्र प्रकाशझोत असतो. तो डोळ्यावर पडल्यानंतर डोळ्यांवर ताण येऊन बाहुली आकुंचन पावते आणि डोकेदुखी सुरू होते. अपस्माराचे झटके येण्याचा त्रास असलेल्या रुग्णांना अशा प्रकारच्या प्रखर प्रकाशझोतांमुळे हा त्रास वाढण्याची शक्यता अधिक असते. लेझर बीममुळे डोळ्यावर होणारा परिणाम तपासण्याची आवश्यकता आहे. – डॉ. संजय पाटील, नेत्र शल्यचिकित्सक.
ऐकू न येण्याच्या तक्रारींतही वाढ
विसर्जन मिरवणुकीतील दणदणाटामुळे ऐकू न येण्याची तक्रार घेऊन येणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही वाढले आहे. ससून सर्वोपचार रुग्णालयातील कान, नाक, घसा विभागाचे प्रमुख डॉ. राहुल तेलंग म्हणाले, की मागील काही दिवसांत आमच्या विभागात येणारे ५ ते ७ टक्के रुग्ण मोठ्या आवाजामुळे ऐकू येत नसल्याची तक्रार असलेले आहेत. मिरवणूक काळात मोठ्या आवाजाच्या जवळ असलेल्या व्यक्तींना हा त्रास झाला आहे. असा त्रास झाल्यानंतर २४ तासांत उपचार घेतलेल्या रुग्णांची ऐकण्याची क्षमता पूर्ववत होण्याची शक्यता अधिक असते. मात्र, उपचाराला विलंब झाल्यास कायमचा बहिरेपणा येण्याचा धोका असतो.