हिंदजागर प्रतिनिधी – ऑक्सिरिच कंपनीचे अंदाजे २५०० अनधिकृत जाहिरात फलकऑक्सिरिच कंपनीच्या पुनीत बालन यांना दहिहंडी उत्सवाचे दरम्यानचे कालावधीत अनधिकृत फलक, बोर्ड, बॅनर, फ्लेक्स इ. लावून सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण केल्याने 3 कोटी 20 लाखांचा दंड भरणेबाबतचे आदेश पुणे महापालिका अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी दिले आहेत. यासाठी 2 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.माधव जगताप यांच्या आदेशानुसार पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम २४४,२४५ व त्यानुसार अस्तित्वात आलेल्या महाराष्ट्र महानगरपालिका आकाशचिन्हे (स्काय साईन) व जाहिरात प्रदर्शित करण्याचे नियमन आणि नियंत्रण नियम, २०२२ चे तरतुदीनुसार जाहिरात फलक उभारण्यासाठी पुणे महानगरपालिकेची रितसर पूर्व परवानगी घेणे बंधनकारक आहे. तसेच महाराष्ट्र मालमत्तेच्या विरूपणास प्रतिबंधकरण्याकरीता अधिनियम, १९९५ चे तरतुदीनुसार आणि उच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग केलेला आहे.
७/९/२०२३ ते दि. १७/९/२०२३ दरम्यान दहिहंडी उत्सवामध्ये पुणे महानगरपालिकेच्या महापालिका सहायक आयुक्त कार्यालया अंतर्गत येणाऱ्या हद्दीत परवाना निरीक्षक यांचेमार्फत समक्ष पाहणी केली असता सार्वजनिक ठिकाणी ८ X४ चौ. फुटाचे ऑक्सिरिच कंपनीचे अंदाजे २५०० अनधिकृत जाहिरात फलक कोणतीही पुर्वपरवानगी न घेता उभारून आपण विद्रुपीकरण केल्याचे निदर्शनास आले आहे. सण उत्सव काळामध्ये गणेश उत्सव वगळता सर्व जाहिरातींना शुल्क देय आहे. त्यानुसार सदर अनधिकृत जाहिरात फलकांचे एकुण ८०,००० चौ. फुटाचे र.रु.४०/- प्रति दिन प्रति चौ. फुटाप्रमाणे दहा दिवसांचे ३,२०,००,०००/- वसुलपात्र दंडात्मक रक्कम देय होत आहे. तरी, विना परवाना जाहिरातीपोटी एकूण रक्कम रूपये तीन कोटी वीस लाख फक्त) दंड (विद्रुपीकरण शुल्क) ही नोटीस प्राप्त होताच २ दिवसाचे आत पुणे महानगरपालिकेच्या कोषागारात त्वरीत भरण्यात यावी. सदर रक्कमेचा भरणा विहीत मुदतीत न केल्यास आपले विरूध्द नियमानुसार कायदेशीर कारवाई प्रस्तावित करण्यात येईल व वसुलपात्र रक्कम आपले मिळकतकरातून वसुल केली जाईल याची नोंद घ्यावी. असा इशारा माधव जगताप यांनी दिला आहे.
=== गणेश मारुती जोशी ( प्रतिनिधी )