हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – पुणे शहरामध्ये नुकताच गणेशोत्सव पार पडला, मोठ्या धुमधडाक्यात पार पडलेल्या या गणेशोत्सवात पुनीत बालन ग्रुप तसेच माणिकचंद ऑक्सिरीच यांच्याकडून मोठ्या प्रमाणात फ्लेक्स बाजी करण्यात आली होती.तत्पूर्वी दहीहंडीच्या वेळी देखील बालन यांच्याकडून शहरात फ्लेक्स लावण्यात आले होते. दरम्यान आता पुणे महापालिकेकडून अनधिकृतपणे फ्लेक्स लावल्याप्रकरणी पुनीत बालन यांना 3 कोटी 20 लाख रुपयांच्या दंडाची नोटीस बजावण्यात आली आहे. यातच आता दुसऱ्या बाजूला आय सपोर्ट पुनीत बालन अशा पोस्ट व्हायरल होऊ घातल्या आहेत.पुण्यात अनधिकृतपणे फ्लेक्स बाजी करणाऱ्या पुनीत बालन यांच्यावर पुणे महापालिकेने ३ कोटी २० लाख रूपयांचा दंड ठोठवला आहे. यातच पुणे महानगरपालिकेच्या समोर पुनीत बालन यांच्या सन्मानार्थ सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून महापालिकेचा निषेध व्यक्त करण्यात येणार आहे. यातच आता समाज माध्यमांवर पुनीत बालन यांच्या सन्मानार्थ यांच्याबाबत पोस्टपण व्हायरल होत आहेत.
महानगरपालिका हद्दीमध्ये आकाशचिन्हे (स्काय माईन) व जाहिरात प्रदर्शित करण्यासाठी नियम घालण्यात आले आहेत. त्यानुसार जाहिरात फलक उभारण्यासाठी पुणे महानगरपालिकेची रितसर पूर्व परवानगी घेणे बंधनकारक आहे. दहीहंडीच्या कालावधीमध्ये पुनीत बालन यांच्याकडून सार्वजनिक ठिकाणी ८ x ४ चौ. फुटाचे ऑक्सिरिच कंपनीचे अंदाजे २०००० अनधिकृत जाहिरात फलक कोणतीही पूर्वपरवानगी न घेता उभारून शहरात विदृपीकरण केल्याचे निदर्शनास आल्याचे संबंधित नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.गणेश उत्सव वगळता सर्व जाहिरातींना शुल्क देय आहे. त्यानुसार सदर दहीहंडी कालावधीमध्ये अनधिकृत जाहिरात फलकांचे एकूण ८०,००० चौ. फुटांसाठी ३ कोटी २० लाख रुपये दंड भरण्यास बालन यांना सांगण्यात आले आहे. पुनीत बालन हे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाचे उत्सव प्रमुख आहेत. गणेशोत्सवाच्या काळामध्ये देखील त्यांच्याकडून “पुनीत बालन ग्रुप आणि ऑक्सिरीच”च्या रेलिंग जाहिराती शहरामध्ये मोठ्या प्रमाणात लावण्यात आल्या होत्या. त्यामुळे हा गणेशोत्सव आहे मी ‘ऑक्सिरीचो’त्सव अशी चर्चा देखील सुरू होती. गणेशोत्सव काळामध्ये लावण्यात आलेल्या जाहिरातींवर पालिकेकडून शुल्क आकारण्यात येत नाही. मात्र बालन यांच्याकडून गणेशोत्सवापूर्वी झालेल्या दहीहंडीच्या काळामध्ये लावण्यात आलेल्या फ्लेक्स प्रकरणी आता महापालिकेकडून नोटीस बजावण्यात आल्यानंतर शहरात चर्चेला उधाण आले आहे.
== गणेश मारुती जोशी ( स्थानिक प्रतिनिधी )