हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – निवडणूक आयोगामध्ये शुक्रवारी दुपारी ३ वाजता राष्ट्रवादी प्रकरणामध्ये सुनावणी पार पडणार आहे. शरद पवार गटाकडून अभिषेक मनू सिंघवी हे युक्तीवाद करणार आहेत. तर शरद पवार गटाकडून ८ ते ९ हजार शपथपत्र दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.दुपारी ३ वाजता निवडणूक आयोगामध्ये राष्ट्रवादीच्या निवडणूक चिन्हाबाबतची पहिली सुनावणी पार पडणार आहे. शरद पवार गटाकडून यासंदर्भातील तयारी केली जात आहे. आज शरद पवार यांच्यावतीने दिल्लीत विस्तारीत कार्यसमितीची एक बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीत जर निवडणूक चिन्ह गोठवलं गेलं जर आपल्या विरोधात काही निर्णय आला तर पुढची रणनीती काय असेल यावर चर्चा केली जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, शरद पवार गटाकडून ८ ते ९ हजार शपथपत्र सादर केली गेली आहेत. त्यांचा दावा आहे की, अजित पवार गटापेक्षा शपथपत्रांची संख्या जास्त आहे. तर अजित पवार गटाने सादर केलेल्या कागदपत्रातील दोष देखील शरद पवार गट दाखवणार आहे. काही मृत व्यक्तींच्या नावे शपथपत्र सादर केली गेली आहेत. तर ६० सरकारी कर्मचाऱ्यांचा देखील यामध्ये समावेश करण्यात आला आहे.त्याचबरोबर ९८ शपथपत्र हे शिक्षण संस्थेच्या कर्मचाऱ्यांची आहेत. त्यांचीदेखील शपथपत्रे सादर केल्याचा दावा शरद पवार गटाने केला आहे. शरद पवार गटांची शपथपत्रे अजित पवार गटापेक्षा ४ हजार जास्त असल्याची माहिती आहे. या सुनावणीला या दोन्ही गटातील नेते उपस्थित असणे गरजेचे नाही, मात्र दुसऱ्या फळीतील नेते उपस्थित असण्याची शक्यता आहे. या पहिल्या सुनावणीमध्ये निवडणूक आयोगाचा निर्णय काय येईल याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
=== गणेश मारुती जोशी ( स्थानिक प्रतिनिधी )