हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – ससून रुग्णालयात उपचार घेत असलेला आरोपी ड्रग्ज तस्कर ललित अनिल पाटील (वय 34) याने पोलिसांना चकवा देवून पलायन केले. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. ललित पाटील हा ससून रुग्णालयातून ड्रग्ज तस्करी करत होता.त्यासंबंधीत कारवाई सुरु आहे. ललित पाटीलचा शोध घेण्यात येत आहे. अशातच ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
सुषमा अंधारे यांनी आरोप केला आहे की, ललित पाटील याला ससून रुग्णालयात दाखल करण्यासाठी शिवसेना नेते दादा भुसे यांनी रुग्णालय प्रशासनाला फोन केला होता. दादा भुसे यांचे कॉल रेकॉर्ड चेक करा. खरी माहिती समोर येईल, असा दावा सुषमा अंधारे यांनी केला आहे. ससून रुग्णालय प्रशासन ललित पाटील याला दाखल करण्यास नकार दिला होता असे सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत. सुषमा अंधारे यांनी केलेल्या या आरोपानंतर एकच खळबळ उडाली आहे.सुषमा अंधारे म्हणाल्या, काल नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेतली तसेच कॉंग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी देखील सकाळी सांगितलं की या प्रकरणात शिंदे गटाच्या आमदाराचा हात आहे. म्हणजेच याची माहिती सर्वांना आहे पण नाव कोणी घेतलं नव्हतं पण मी थेट नाव घेताना सांगते की, या प्रकरणात दादा भुसे यांच्या नावाभोवती संशयाचं धुकं असेल तर त्यांचे कॉलरेकॉर्ड का चेक केले जाऊ नयेत? त्यांना प्रश्न का विचारले जाऊ नयेत? जर गृहखात्याची खरंच इच्छाशक्ती असेल की या प्रकरणाचा छडा लावायची तर त्यांनी हा विषय स्पष्ट करायला हवा”
दादा भुसे काय म्हणाले ?
सुषमा अंधारे यांनी केलेल्या आरोपावर मंत्री दादा भुसे यांनी टीव्ही 9 वाहिनीशी बोलताना सांगितले की, सुषमा अंधारे यांनी केले आरोप चुकीचे आहेत. याप्रकरणाची चौकशी करण्यात यावी. आठ दिवसात चौकशीमध्ये काही निष्पन्न झाले नाही तर सुषमा अंधारे यांनी मालेगावकर नागरिकांची दिलगिरी व्यक्त करावी. तसेच त्यांच्यावर मानहानीचा खटला दाखल करू, असे त्यांनी म्हंटले आहे.दरम्यान, याप्रकरणी पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रविंद्र धंगेकर म्हणाले की, या प्रकरणात ससून रुग्णालयाचे डीन स्वतः दोषी आहेत, त्यांची व्यवस्था दोषी आहे. ललित पाटील एका वॉर्ड मध्ये फिरतोय की हॉटेल मध्ये, कुठे चाललो आहोत आपण. या ठिकाणचे डॉक्टर खोटं बोलत आहेत. पुणे शहरात ड्रग्स माफिया आहेत, हे पोलिसांना ही माहिती आहे, तुम्ही आम्ही कमी पडतोय या गोष्टीत. ललित पाटील हा रुग्ण होता आणि तरी तो पळतोय यात शिंदे गटाचे मंत्री ललित पाटीलच्या प्रकरणात सामील आहेत, असे गंभीर आरोप धंगेकरांनी केले आहेत.
=== गणेश मारुती जोशी ( स्थानिक प्रतिनिधी )