हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांनी चतुःशृंगी मंदिरात नवरात्र उत्सव रंगणार असून, जीर्णोद्धाराचे काम सुरू असतानाही यंदाच्या नवरात्र उत्सवामध्ये चतुःशृंगी मंदिर भाविकांना दर्शनासाठी 24 तास खुले ठेवण्यात येणार आहे.देवीचा गाभारा तसाच ठेवून सभामंडपाचा विस्तार, मंदिरामध्ये येण्या-जाण्याच्या पायर्या, पुजारी निवास आणि ध्यान मंदिराची उभारणी ही कामे जीर्णोद्धाराच्या पहिल्या टप्प्यामध्ये करण्यात येणार आहेत. यंदाच्या नवरात्रोत्सवासाठी देवीला नवी चांदीची आयुधे करण्यात आली आहेत. रविवारी (दि. 15) सकाळी घटस्थापना झाल्यावर ही आयुधे देवीला परिधान करण्यात येणार आहेत.मंदिराचे विश्वस्त व्यवस्थापक डॉ. गंगाधर अनगळ हे यंदाच्या नवरात्रोत्सवाचे सालकरी असून, त्यांच्या हस्ते अभिषेक, रुद्राभिषेक, महापूजा, महावस्त्र अर्पण करून रविवारी सकाळी साडेनऊ वाजता घटस्थापना होणार आहे. विजयादशमीपर्यंत रोज सकाळी दहा वाजता आणि रात्री नऊ वाजता आरती होणार आहेत. तर, गणपती मंदिरामध्ये दररोज भजन, कीर्तन, प्रवचन, सामूहिक श्रीसूक्त पठण, वेदपठण असे धार्मिक कार्यक्रम होतील. निवारा वृद्धाश्रमातील आजीबाईंचा 21 तारखेला भोंडला होणार आहे.
सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक, स्वयंसेवक, पोलिसदल, निमलष्करी दल यांची नियुक्ती,मंदिर परिसरात जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे .आपत्कालीन परिस्थितीमध्ये भाविकांना वैद्यकीय सुविधा.पॉलिटेक्लिक महाविद्यालयाच्या मैदानावर विनामूल्य पार्किंगची सुविधा.भाविकांचा दोन कोटी रुपयांचा विमा.भाविकांसाठी ऑनलाईन दर्शन पासची व्यवस्था.
खंडेनवमीला सोमवारी (दि. 23) दुपारी तीन वाजता नवचंडी होम होणार आहे. विजया दशमीला (दि. 24) बँडपथक, ढोल-ताशा पथक, लेझीमपथक, नगारावादन, चौघडावादन, भुत्ये, वाघ्या-मुरळीसह, देवीच्या सेवेकरी आणि भाविकांच्या सहभागासह सायंकाळी पाच वाजता देवीची पालखीतून सीमोल्लंघनाची मिरवणूक निघेल. हेलिकॉप्टरमधून देवीच्या पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे, अशी माहिती श्री देवी चतुःशृंगी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार अनगळ आणि व्यवस्थापकीय विश्वस्त नरेंद्र अनगळ यांनी मंगळवारी दिली. ट्रस्टकडून मंदिरात जीर्णोद्धाराचे काम करण्यात येत आहे. अंदाजे ऑगस्ट 2024 पर्यंत हे काम पूर्ण होणार असल्याचेही सांगण्यात आले.
==== प्रदीप कांबळे ( स्थानिक प्रतिनिधी )