हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – महाराष्ट्र केसरी स्पर्धा म्हणजे कुस्तीचा कुंभमेळा… महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठेची लढाई म्हणून याकडे पाहिलं जातं. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा येत्या 4 ते 9 नोव्हेंबरला पुणे येथे होत आहे.गेली अनेक वर्षे कुस्तीचं नेतृत्व शरद पवार यांच्याकडे राहिलंय. मात्र, आता शरद पवार यांच्या प्रतिष्ठेला धक्का बसल्याचं पहायला मिळतंय. कारण यंदा पुण्यात होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून शरद पवार यांनी नव्हे तर भाजपच्या वरिष्ठ नेत्याला आमंत्रित करण्यात आलं आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात कुस्तीगीर संघटनेतही गट निर्माण झालेत का? असा सवाल विचारला जातोय.
शरद पवार यांना निमंत्रण देण्यात येणार नसल्याचं कळतंय. त्यामुळे महाराष्ट्र केसरी, त्यादेखील पुणे शहरातील वाघोली येथे होतील. मात्र, शरद पवार या वेळी प्रमुख पाहुणे नसतील. यंदा महाराष्ट्र केसरी स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित असणार आहेत. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी गेली अनेक वर्षे शरद पवार आहेत.
सत्तेत आल्यानंतर भाजपने सवता सुभा निर्माण करत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ ही स्वतंत्र संघटना निर्माण केली होती. भाजपचे नेते रामदास तडस हे त्याचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे आता भाजपने कुस्तीच्या मैदानात देखील शरद पवारांना धोबीपछाड दिलाय, अशी चर्चा सध्या होताना दिसत आहे. दरम्यान, पुणे येथे वाघोली लोणीकंदजवळ फुलगाव येथे नेताजी सुभाषचंद्र बोस शाळेच्या मैदानावर या स्पर्धा होणार आहेत. त्याची घोषणा देखील झाली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र केसरीची रंगत आणखीच वाढल्याचं पहायला मिळतंय. कुस्तीच्या मैदानाबरोबरच राजकारणाच्या मैदानात देखील महाराष्ट्र केसरीमुळे वातावरण तापल्याचं दिसून येतंय.