हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतरही पक्षाध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे अनेक नेते ‘वजन’ राखून ठेवण्याची धडपड करीत आहेत. मात्र, फुटी नंतर माजी नगरसेवक योगेश ससाणेंनी अजितदादांना उघडपणे साथ न देता ‘ वेट अँड वॉच ” ‘च्या भूमिकेत राहणे पसंत केले होते तरीही हडपसरमधील त्यांच्या एका कार्यक्रमाला अजितदादांना बोलावून ससाणेंनी शरद पवार गटातील नेत्यांना ‘कन्फ्यूज’ टाकले.या कार्यक्रमानंतरही ससाणेंनी आपले खरे पत्ते काही उघड केले नाहीत, पण याच ससाणेंनी पवारसाहेबांची भेट घेतली आणि प्रभागांतील दुसऱ्या कार्यक्रमाला येण्याची गळ घातली. पवारसाहेबांनी ससाणेंना अजून तरी वेळ दिला नाही. मात्र, पवारसाहेबांची भेट घेऊन २४ तास उलटण्याआधीच अजितदादांनी ससाणेंची झाडाझडती घेतली. ‘साहेबांकडे कसे काय गेलात ? काय काम होते ?’ एका दमात असे आठ-दहा सवाल करीत, अजितदादांनी ससाणेंना अक्षरश: घामच फोडला.
दोन्ही पवारांच्या गटाला खूष ठेवून, अशा प्रकारे दोन पत्त्यांचा ‘गेम’ खेळणाऱ्या सासणेंनीही अजितदादांना भन्नाट खुलासा करीत, ‘मी पक्षाचाच आहे’ असे जाहीर करून मोकळे झाले. परंतु, कोणाच्या पक्षात (पवारसाहेब की अजितदादा) हे न सांगताच ससाणेंनी अजितदादांच्या प्रश्नांना गुंडाळल्याचे दिसून आले.राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर हडपसरमधील सातववाडीतून नगरसेवक राहिलेले योगेश ससाणे अजितदादांच्या अत्यंत जवळचे मानले जातात, पण राष्ट्रवादीतील बंडानंतर ससाणे ‘न्यूट्रल’ राहिले. खरं तर हडपसरचे आमदार चेतन तुपे कोणाच्या गटात जाणार? याकडे डोळे लावलेल्या ससाणेंनी तूर्त तरी कोणाकडे न जाण्याची भूमिका घेतली. ससाणे हे चेतन तुपेंना आपले स्पर्धक मानतात.
जर तुपे पवारसाहेबांकडे गेले असते; तर ससाणे सरळसरळ अजितदादांच्या बाजूने उभे राहिले असते. त्यातही तुपे हे पहिल्याच टप्प्यात अजितदादांच्या गटात सामील झाले असते, तर ससाणेंनी पवारसाहेबांना साथ दिली असती; पण पक्षातील विशेषतः ससाणे आणि पक्षातील इतरांच्या खेळ्या जवळून पाहिलेल्या तुपेंनी सुरुवातीला ‘सस्पेन्स’ कायम ठेवून, अप्रत्यक्षपणे ससाणे यांच्यासारख्या स्पर्धकांना खेळवतच ठेवले.दुसरीकडे, राष्ट्रवादीतील गोंधळ वाढत चालल्याने ससाणेंना नवे शहाणपण सुचले आणि राष्ट्रध्वजाच्या उद्घाटनाला अजितदादांना बोलविले. तेव्हा दोन्ही गटांच्या नेत्यांना निमंत्रणे धाडून, ‘ओळखा ससाणे कोणाच्या गटात?’ हा प्रश्न उभा करून ससाणेंनी पक्षातील नेत्यांना डोके खाजवायला भाग पाडले. ससाणे एवढ्यावर थांबले नाहीत. आता पुन्हा आणखी एका राष्ट्रध्वजाचे उद्घाटन पवारसाहेबांच्या हस्ते करण्याची भूमिका घेतली.त्यासाठी त्यांनी पवारसाहेबांची पुण्यात मोदी बागेत जाऊन भेट घेतली. कार्यक्रमासाठी वेळ मागितली. मात्र, पवारसाहेबांची वेळ मिळायच्या आधी ससाणेंना अजितदादांकडून प्रसाद मिळाला. ससाणे हे पवारसाहेबांना भेटल्याचे कानावर येताच, अजितदादांनी मंत्रालयातून फोन केला. ‘कसे काय गेला होता ? काही महत्त्वाचे काम होते ? ते झाले का ? अशी विचारणा अजितदादांनी केली.
पवारसाहेबांच्या भेटीनंतर अजितदादांचा फोन आला, पण ते खूप छान बोलल्याचे ससाणे आता सांगत आहेत. मात्र, कुरघोड्या करण्याची एकही संधी न सोडणाऱ्या ससाणेंना अजितदादा काही साधे बोलले नसावेत. तरीही ससाणे ‘कॉलर’ टाइट ठेवूनच ‘दादा मला काही बोलले’ नसल्याचे दाखवून देणार, हे नक्की. त्यापलीकडे ससाणेंच्या कार्यक्रमाला पवारसाहेब येणार का आणि प्रत्यक्ष भेटीत अजितदादा ससाणेंना काय बोलणार, याकडे माध्यमांचे बारीक लक्ष राहणार आहे.
=== हिंदजागर न्यूज, टीम पुणे .