हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – तरुणांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी दसरा सणाचे औचित्य साधत,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली पुणे ते नागपूर तब्बल ८०० किलो मीटरच्या युवा संघर्ष यात्रेला सुरुवात झाली आहे.त्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची टिळक स्मारक मंदिरात सभा झाली. त्यावेळी शरद पवार यांनी राज्य सरकारला चांगलेच सुनावले. मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे राज्यातील अनेक भागात जाऊन भूमिका मांडत आहे. या सर्व घडामोडी घडत असून शरद पवार हे पुण्यातील कार्यक्रम झाल्यानंतर शिवाजीनगर येथील निवासस्थानी जात होते. त्यावेळी अलका टॉकीज चौकात विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी मराठ्यांचा कर्दनकाळ शरद पवार, शरद पवार गो बॅक अशा घोषणा देत ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी वेळीच या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.यावेळी चेतन वाघज म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडी सरकार होते. त्यावेळी शरद पवार यांनी मराठा आरक्षण घालविण्याचे काम केले आहे. त्यामुळे शरद पवार यांनी आता मराठा आरक्षणासाठी पाठिंबा द्यावा, या मागणीसाठी आज आम्ही आंदोलन केले असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच ते पुढे म्हणाले की, स्वतःची संघर्ष यात्रा काढण्यापेक्षा मराठा तरुणांच्या संघर्ष यात्रेकडे लक्ष द्यावे. हे शरद पवार यांना समजत नाही का? असा सवाल उपस्थित करीत ते पुढे म्हणाले की, स्वतःचा पुतण्या म्हणतो की, तुम्ही आता रिटायर्ड व्हा, कोण कोणत्या बाजूला गेले. याबाबत आम्हाला काही देणे घेणे नाही. आमच्या समाजाचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे अशी भूमिका मांडत शरद पवार यांच्यावर त्यांनी टीका केली.