हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – शिवाजीनगर-घोले रोड आणि औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणार्या उद्यानांची देखभालविषयक कामे करण्यासाठी उद्यान विभागाने काढलेल्या निविदेमध्ये ठेकेदारांनी मोठ्या प्रमाणात अर्थपूर्ण व्यवहार केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.दोन्ही निविदा 0.1 टक्के जादा दराने स्थायी समितीने मंजूर केल्या आहेत.महापालिकेच्या उद्यान विभागाने शिवाजीनगर-घोले रोड आणि औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणार्या उद्यानांची हॉर्टिकल्चर विषयक देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यासाठी निविदा मागवल्या होत्या.
निविदा प्रक्रिया ऑनलाईन आहे जे ठेकेदार निविदेतील अटी शर्ती नुसार पात्र होतात त्याचीच निवड होते त्यानंतर ज्याची निविदा कमी दराने येते त्याला ते काम मिळते. —– गुरुस्वामी तुंमले,सहाय्यक उद्यान अधीक्षक, उद्यान विभाग, पुणे महानगर पालिका,पुणे
औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणार्या उद्यानांच्या देखभाल दुरुस्तीसाठी पहिल्या निविदेत 5 टक्के जादा दराने भाग घेणार्या ठेकेदाराने या ठिकाणी मात्र 0.1 जादा दराने 31 लाख 79 हजार 911 रुपयांची निविदा भरली, तर शिवाजीनगर-घोले रस्त्याचे काम मिळालेल्या ठेकेदाराने या ठिकाणी दोन नंबरची 31 लाख 80 हजार 197 रुपयांची निविदा भरली. म्हणजे शिवाजीनगर-घोले रोडच्या निविदेत एक नंबरला असलेला ठेकेदार औंध-बाणेरच्या निविदेत दोन नंबरला राहिला, तर शिवाजीनगर-घोले रोडच्या निविदेत दोन नंबरला असलेला ठेकेदार औंध-बाणेरच्या निविदेत एक नंबरला राहिला. त्यामुळे या निविदा प्रक्रियेत ठेकेदारांचे अर्थपूर्ण व्यवहार झाल्याचे समोर आले आहे.
उद्यानांच्या देखभाल -दुरुस्तीची कामे करणार्या ठेकेदारांची संख्या कमी आहे. पंधरा क्षेत्रीय कार्यालयांमधील उद्यानांसाठी पाच ते सहाच ठेकेदार आहेत. त्यामुळे निविदा जास्त दराने येतात, शिवाय एक ठेकेदार अनेक ठिकाणी दिसतात, त्यामुळे यात साटेलोटे झाले, असे म्हणता येणार नाही.अशोक घोरपडे, मुख्य उद्यान अधीक्षक, उद्यान विभाग, महापालिका.
शिवाजीनगर-घोले रोड कार्यालयांतर्गत असलेल्या उद्यानासाठी तीन ठेकेदारांनी निविदा भरल्या होत्या. यामध्ये सर्वात कमी म्हणजे 44 लाख 52 हजार 277 रुपयांची म्हणजे 0.1 टक्के जादा दराची निविदा मंजूर करण्यात आली आहे. या निविदा प्रक्रियेत भाग घेतलेल्या दोन नंबरच्या ठेकेदाराने 5 टक्के जादा दराने निविदा भरल्याने ती नाकारण्यात आली.