हिंदजागर न्यूज प्रतिनिधी, पुणे – ऐन दिवाळीत सराफी पेढी लुटण्याचा चोरट्यांचा डाव भारती विद्यापीठ पोलिसांनी उधळून लावला आहे. याप्रकरणी चोरट्यांच्या टोळीला अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून दोन पिस्तूल, पाच काडतुसे, तीन दुचाकी, असा चार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.राधेमोहन ऊर्फ मुन्ना सीताराम पिसे (वय 19, रा. वारजे माळवाडी), समीर ज्ञानेश्वर मारणे (वय 20, रा. नर्हे), अर्जुन मोहन बेलदरे (वय 20, रा. आंबेगाव, कात्रज), तुषार दिलीप माने (वय 19), यश मनोज लोहकरे (वय 19), अनिल दिलीप माने (वय 20), ओंकार ऊर्फ मयूर दादासाहेब माने (वय 20) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भारती विद्यापीठ परिसरातील त्रिमूर्ती चौकात खरेदीसाठी मोठी गर्दी होती. या भागातील सराफी पेढीवर दरोडा घालण्यासाठी चोरट्यांची टोळी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. गस्त घालणार्या पोलिसांच्या पथकाने सापळा लावून आरोपी पिसे, मारणे, बेलदरे, माने, लोहकरे, माने यांना पकडले. त्यांच्याकडून दोन पिस्तुले, पाच काडतुसे, दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक निरीक्षक अमोल रसाळ, उपनिरीक्षक धीरज गुप्ता, मंगेश पवार, अभिजित जाधव, सचिन सरपाले, चेतन गोरे, नीलेश जमदाडे, शैलेंद्र साठे, महेश बारवकर, अवधूत जमदाडे, नीलेश ढमढेरे, मितेश चोरमोले आदींनी ही कामगिरी केली.
आरोपी सराईत आहेत. त्यांच्या मित्राचा खून झाला होता. मित्राच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आरोपींनी पैशांची जुळवाजुळव सुरू केली होती. मित्राच्या खुनाचा बदला घेण्यासाठी त्यांनी भारती विद्यापीठ परिसरातील सराफी पेढी लुटण्याचा कट रचल्याचे तपासात निष्पन्न झाले. खुनाचा बदला घेतल्यानंतर जामिनासाठी लागणार्या पैशांची अगोदरच जुळवाजुळव करून ठेवण्यासाठी त्यांनी ही तयारी केली होती. मात्र, वेळीच पोलिसांनी त्यांचा डाव हाणून पाडला.
— गणेश मारुती जोशी ( हिंदजागर न्यूज, पुणे )