हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी, पुणे –लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात काँग्रेसने दमदार कामगिरी केली. पण पुण्यामध्ये पराभवाला सामोर जावं लागलं आहे. आज प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुण्यात आले होते.त्यावेळी बॅनरबाजीवरून कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. कार्यकर्त्यांमध्ये मारामारी झाली. यामध्ये एकाचं डोकं फुटलं आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये पुण्याची जागा पराभवानंतर नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक होण्याआधी एका कार्यकर्त्याच्या बॅनरमुळे मोठा वाद रंगला. बॅनर झळकवणाऱ्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्याच डोकं फुटलं आणि कार्यकर्ता रक्तबंबाळ झाला. महत्वाचं म्हणजे, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज पुण्यात दौऱ्यावर असताना हा सगळा प्रकार घडला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरुन कॉँग्रेस पक्षात सुरू झालेली धुसफूस अद्यापही सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. लोकसभेचे कॉँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना माजी नगरसेवक आबा बागूल यांनी विरोध केला होता. त्यावेळी धिवार यांनी बागूल यांना पक्षातून काढून टाका अशी मागणी केली होती. दरम्यान, या वादाची किनार या हाणामारीला आहे का हे पोलिसांकडून तपासून पाहिले जात आहे. दरम्यान, कॉँग्रेस भवनमध्ये बंदोबस्ताला असलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ धिवार यांना मारहाण करणाऱ्यांपैकी एकास ताब्यात घेतले. धिवार यांच्या तक्रारीवरून योग्य ती कारवाई करण्याचे काम सुरू असल्याचे शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी सांगितले.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी श्री शंकर महाराज मठात भारतीय जनता पक्षाच्या दोन गटात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या समोरच हाणामारी झाली होती. त्यावेळी मुकेश धिवार देखील मठात उपस्थित होते. त्यांनी यासंदर्भात भाजप आणि रा. स्व. संघाच्या हिंदुत्वावर टीका करणारा व्हिडिओ मठामध्ये रेकॉर्ड करून समाजमाध्यमावर प्रसारित केला होता. आता, धिवार यांनाच कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे.