हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी, पुणे – पुण्यातील पोर्शे अपघातानंतर पुन्हा एकदा पुण्यात भीषण अपघात झाल्याचं समोर आलं आहे. महत्त्वाची आणि धक्कादायक बाब म्हणजे, पुण्यातील खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्याकडून अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.आमदार पुतण्यानं बेदरकारपणे गाडी चालवून दोघांना गाडीखाली चिरडल्याची माहिती समोर येत आहे. पुणे-नाशिक महामार्गावर कळंब येथे झालेल्या अपघातात आमदारांच्या पुतण्यानं बेदरकारपणे दोघांना चिरडल्याची माहिती मिळत आहे. दुचाकी आणि कारच्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. अपघातात ओम सुनिल भालेराव याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, रविवारी मध्यरात्री पुणेनाशिक महामार्गावर हा भीषण अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिकांनी अपघाताची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटाचे) खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री उशीरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मयूर मोहिते असं आमदार दिलीप मोहिते पाटलांच्या पुतण्याचं नाव आहे. अपघातावेळी आरोपी आमदार पुतण्यानं मद्य प्राशन केलेले का? याचाही तपास सुरू आहे.
आमदार दिलीप मोहिते पाटलांच्या पुतण्यानं बेदरकारपणे गाडी चालवून दोघांना आपल्या गाडीनं चिरडलं. या घटनेत ओम भालेराव (वय 19 वर्ष) तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा पुतण्या मयुर हा पुणे-नाशिक महामार्गावरून कारनं पुण्याच्या दिशेनं येत होता. तो विरुद्ध दिशेनं सुसाट गाडी चालवत होता. त्यावेळी समोरून आलेल्या दोन दुचाकीस्वारांना त्याच्या भरधाव कारनं धडक दिली. अपघात इतका भीषण होता, की दुचाकी हवेत उडाली आणि दुचाकीवरील तरुण रस्त्याच्या कडेला जाऊन पडले. यापैकी एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. डोक्याला जबर दुखापत झाल्यामुळे ओम भालेराव या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर या अपघातातील दुसरा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, पुण्यातील पोर्शे अपघातानंतर पोलीस प्रशासनावर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. तसेच, पुणे पोर्शे अपघातानंतर झालेल्या पुणे-नाशिक महामार्गावरील अपघातात आणखी एका आमदाराचं कनेक्शन समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळातही चर्चांना उधाण आलं आहे. पुणे पोर्शे अपघातात आमदार सुनील टिंगरे यांचं नाव समोर आलं होतं. तसेच, रविवारी झालेल्या पुणे-नाशिक अपघातात आमदार दिलीप मोहिते पाटलांचं नाव समोर आलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, दोन्ही आमदार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आहेत.