हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – पुणे – सोमेश्वर फाऊंडेशन व क्रीडा जागृती आयोजित विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना सनीज् वर्ल्डचे चेअरमन व सोमेश्वर फाउंडेशनचे अध्यक्ष उद्योगपती सनी निम्हण आणि क्रीडा जागृतीचे अध्यक्ष प्रताप जाधव यांनी सांगितले की, सलग दुस-या वर्षी माजी आमदार कै.विनायक निम्हण यांच्या जयंतीनिमीत्त सनी स्पोर्ट्स किंग्डम, सनीज वर्ल्ड या ठिकाणी या स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे.या स्पर्धेच्या माध्यमातून राज्यांतील गुणवान खेळाडूंना आपली गुणवत्ता दाखवण्याची संधी मिळावी या हेतूने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन :-
सोमेश्वर फाऊंडेशनचे उमेश वाघ यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेबरोबरच जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन सलग दुस-या वर्षी करण्यात येत आहे. ही स्पर्धा ९ ते ११ ऑगस्ट २०२४ या कालावधीत सनी स्पोर्ट्स किंग्डम, सनीज वर्ल्ड मधील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बॅडमिंटन कोर्टवर रंगणार आहे.
पीडीएमबीएचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे आणि मानद सचिव रणजित नातू यांच्या सहकार्याने व मान्यतेने होत असलेल्या या स्पर्धेत जिल्ह्यातून सुमारे ४०० खेळाडू सहभागी होतील. बॅडमिंडनच्या प्रवेशिका ६ ऑगस्ट पर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत. पीडीएमबीएच्या नियमानुसार स्पर्धेमधील विजेत्यांना रोख बक्षिसे, प्रशस्तिपत्र आणि ट्रॉफी देऊन गौरविण्यात येणार आहे.
कॅरम स्पर्धेतील खेळाडूंची मानांकन यादी खालीलप्रमाणे :–
पुरुष एकेरी : १) महम्मद घुफ्रान (मुंबई), २) विकास धारिया (मुंबई), ३) प्रशांत मोरे (मुंबई), ४) अभिजित त्रिपनकर (पुणे), ५) पंकज पवार ( मुंबई ), ६) रहिम खान (पुणे), ७) संदीप दिवे (मुंबई उपनगर), ८) झैद फारुकी (ठाणे)
महिला एकेरी : १) काजल कुमारी (मुंबई), २)समृद्धी घाडीगावकर (ठाणे), ३) प्राजक्ता नारायणकर (मुंबई उपनगर), ४) आकांक्षा कदम ( रत्नागिरी), ५) अंबिका हरिथ (मुंबई), ६) श्रुती सोनावणे (पालघर), ७) उर्मिला शेंडगे (मुंबई) ८) केशर निर्गुण (सिंधुदुर्ग).
महिला एकेरी गटात ३२ खेळाडूंचा सहभाग :-
महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे चेअरमन भरत देसलडा आणि मानद सचिव अरुण केदार यांनी स्पर्धेविषयी माहिती देताना सांगितले कि, महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व कॅरम असोसिएशन ऑफ पुणे यांच्या मान्यतेने आणि स्पर्धेचे मुख्य आश्रयदाते सनी निम्हण यांच्या पुढाकाराने ही स्पर्धा पुण्यात होत आहे. गतवर्षी देखील या ठिकाणी पार पडलेल्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेला खेळाडूंकडून भरघोस प्रतिसाद लाभला होता. यावर्षी या स्पर्धेत पुरुष एकेरी गटात १८० खेळाडूंनी तर महिला एकेरी गटात ३२ खेळाडूंनी भाग घेतला आहे. महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या युट्युब चॅनलवरून या सामन्यांचे थेट प्रसारण करण्यात येणार आहे.
महिला एकेरी गटात ७५ मानंकीत गुणांसह आघाडीवर :-
स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटात ५८ मानांकन गुण असलेल्या मुंबईच्या महम्मद घुफ्रान याला तर महिला एकेरी गटात ७५ मानंकीत गुणांसह आघाडीवर असलेल्या मुंबईच्या काजल कुमारीला अग्र मानांकन देण्यात आले आहे. २ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ९ वाजता पुरुष एकेरी गटाने सुरुवात होणार असल्याचे मानद सचिव अरुण केदार यांनी सांगितले.
Repoter – प्रदीप कांबळे.