हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी – पुणे – पुण्यात पुन्हा मुसळधार पाऊस सुरू असून खडकवासला धरणातून विसर्ग वाढवण्यात येत आहे. खडकवासला धरणात येव्याच्या दुप्पट विसर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. रेड अलर्ट आणि पुन्हा पुराची भीती असल्याने पाटबंधारे विभागाने दक्षता म्हणून आधीच विसर्ग वाढवला आहे.दरम्यान, एकता नगर मधल्या द्वारका इमारतीच्या पार्किंग मध्ये पाणी भरलं असून नागरिकांना बाहेर काढायला सुरूवात करण्यात आलीय. पुणेकरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.
खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीत पात्रात २९ हजार क्युसेक इतका विसर्ग सुरू होता. तो आता ३५ हजार क्युसेक इतका करण्यात आला आहे. पावसाचे प्रमाण आणि येव्यानुसार विसर्ग कमी जास्त करण्यात येईल अशी माहिती खडकवासला पूर नियंत्रण कक्षाने दिलाय.
खडकवासला धरणात सध्या 14 ते 15 हजार क्युसेकचा येवा येत आहे. तरीही पाटबंधारे विभाग विसर्ग थेट 35 हजार क्यूसेक करणार आहे. नियमानुसार धरणात जेवढा ‘येवा’ येतो तेवढाच किंवा 80 टक्के विसर्ग केला जातो. पण रेड अलर्ट अनुसार अचानक पाऊस वाढला तर पुन्हा जास्त पाणी सोडावं लागणार आहे. त्यामुळे भीतीने पाटबंधारे विभागाने आधीच जास्तीचं पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
पुण्यात मुठाची पूर रेषा यापूर्वी 50 ते 60 हजार क्युसेकची होती. पण नदी पात्रात अतिक्रमणामुळे गेल्या आठवड्यात 35 हजार क्युसेकलाच एकता नगर सारख्या नदी काठच्या वस्तीत पाणी शिरलं होतं. दरम्यान, खडकवासला साखळी धरणात 28 हजार क्युसेकचा येवा येत असल्यानेत विसर्ग 35 हजार क्युसेकपर्यंत वाढवावा लागत असल्याची माहिती पाटबंधारे अभियंता गुणाले यांनी दिलाय.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे जिल्ह्यातील ब्लू लाईन म्हणजेच धोकादायक पूर रेषेच्या आतील नागिरकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे जिल्हाधिकारी, पुणे शहर महापालिका आयुक्त आणि आपतकालिन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी याबाबत फोनवरून चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच ब्लू लाईन म्हणजेच धोकादायक पूर रेषाच्या आत रहाणाऱ्या सर्व नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करा असे आदेश देखील मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. एवढंच नाही तर स्थलांतरीत नागरिकांच्या दोन्ही वेळ जेवणाची, रहाण्याची आणि त्यांना लागेल ती मदत करण्याच्या सुचनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सर्व अधिकाऱ्यांना करण्यात आल्या आहेत.
Repoter – गणेश मारुती जोशी .