हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – पुणे – महापालिकेतर्फे बाणेर येथे आदिवासी, मागासवर्गीय विद्यार्थिनींसाठी वसतीगृह बांधण्याचे काम सुरु असताना या कामाच्या निविदेबाबत तक्रारी करून अडथळा निर्माण करून उद्धट वर्तन करणाऱ्या काँग्रेस नेत्याचा खास व माहिती अधिकारात पटाईत असलेल्या कार्यकर्त्याला भाजपच्या माजी नगरसेविका राजश्री काळे यांनी महापालिकेत चपलेने चोप दिला.
वसतिगृहाच्या निविदेचा पाठपुरावा करण्यासाठी राजश्री काळे या सायंकाळी महापालिकेतील भवन विभागात आल्या होत्या. त्यावेळी या कार्यकर्त्याने ‘तुझे काम मी होऊ देणार नाही, कार्यादेश कसे निघतात ते मी बघतोच’ अशी धमकी दिली. तेथे त्यांच्यात शाब्दीक वाद झाल्यानंतर काळे निघून गेल्या.
त्यानंतर काही वेळाने तो कार्यकर्ता एका अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये घुसला, तेथे राजश्री काळे बसलेल्या असताना संतप्त काळे यांनी या कार्यकर्त्याला थेट चपलेने मारहाण सुरु केली. तो त्या केबिनमधून बाहेर पडून दुसऱ्या अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये घुसला. काळे या तेथे जावून त्याला पुन्हा बेदम मारहाण केली.या स्वतःला चाणक्य समजणाऱ्या या कार्यकर्त्याला महिलेकडून चपलेने मारहाण झाल्याने महापालिकेत एकच खळबळ उडाली. त्यावेळी तेथे भाजपचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, गणेश घोष हे आले असता त्यांनी यामध्ये मध्यस्ती केल्याने या कार्यकर्त्याची सुटका कशीबशी झाली. दरम्यान, या माहिती अधिकार कार्यकर्त्यांना काँग्रेस नेत्याच्या लेटरहेडचा वापर करून अनेक तक्रारी केलेल्या आहेत.
तक्रार नेत्याची मग कार्यकर्त्याला मारहाण का?
याप्रकरणात माझी तक्रार आहे, त्याने तक्रार केलेली नाही असे सांगत काँग्रेसच्या नेत्याने त्याची बाजू सावरून घेण्याचा प्रयत्न केला. पण यामुळे नेत्याची तक्रार असताना कार्यकर्त्याला चपलेने मार खाण्याची वेळ का आली? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
— पी. संभाजी सूर्यवंशी ..