हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी – मुंबई – राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला असून त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. बाबा सिद्दिकी यांच्यावर तिघांनी सहा गोळ्या झाडल्या असून एक आरोपी हा हरियाणातील आहे तर दुसरा आरोपी हा उत्तर प्रदेशातील असल्याची माहिती आहे.तिघांपैकी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून सिद्दिकी यांच्या हत्येमागे एका बड्या गँगस्टरचा हात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामागे सलमान खान गोळीबार कनेक्शन असून बिश्नोई गँगचा त्यामागे हात असल्याचा संशय व्यक्त करत पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर आमदार झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयासमोरच गोळीबार करण्यात आला. त्यामध्ये बाबा सिद्दिकी यांच्या जागेवरच मृत्यू झाला. शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास बाबा सिद्दिकी यांच्यावर तिघा अज्ञातांनी सहा गोळ्या झाडल्या.
लॉरेन्स बिश्नोई गँगचा सहभाग असल्याचा संशय
या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतलं असून तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. यामागे एका मोठ्या गँगस्टरचा हात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याचा यामध्ये सहभाग असल्याचा संशय पोलिसांना असून त्या दृष्टीने तपास सुरू केला आहे. काही दिवसांपूर्वी लॉरेन्स बिश्नोई गँगच्या सदस्यांनी सलमान खानच्या घरावरही गोळीबार केला होता.
सलमान खान कनेक्शन असल्याचा संशय
बाबा सिद्दिकी हे सलमान खानचे निकटवर्तीय असून त्यांनी सलमानला वेळोवेळी मदत केली आहे. त्यामुळे बाबा सिद्दिकी यांच्यावर बिश्नोई गँगने गोळीबार केला आहे का याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.
पंधरा दिवसांपूर्वीच जीवे मारण्याची धमकी
बाबा सिद्दिकी यांना 15 दिवसांपूर्वीच जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर त्यांना वाय दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात आली होती. तरीही त्यांची हत्या झाली. दसऱ्याच्या गर्दीचा फायदा घेऊन मारेकऱ्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.पण आता मोठी बातमी म्हणजे बाबा सिद्दिकी हत्येचे पुणे कनेक्शन समोर आले आहे. तिन्ही आरोपींना पुण्यातून बोलवल्याचा संशय वक्त केल्या जात आहे.
खेरवाडी परिसरात या दरम्यान फटाके वाजवण्यात येत होते. त्याचवेळी आरोपींनी बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार केला. त्यानंतर आरोपी पळून जात होते. त्यापैकी दोघांना जमावाने पकडले तर एक आरोपी पळून गेला. पोलिस त्याच्या मागावर आहेत.
—- अनुराग भालचंद्र साळुंखे .