हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी – पुणे – पुणे शहरातील तीन जागांवर काँग्रेसच्या उमेदवारांचे नाव जवळपास निश्चित झाली आहेत. पुणे जिल्ह्यातून भोर आणि पुरंदर येथील विद्यमान आमदारांचे नाव निश्चित झाले आहे. भोरमधून संग्राम थोपटे आणि पुरंदरमधून संजय जगताप यांच्या नावाला पसंती मिळाली आहे.काँग्रेसच्या पहिल्या यादीत पुणे शहरातील ३ जागांवर उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.
कसबा, कॅन्टोन्मेंट आणि शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाला हाय कमांडकडून शिक्कामोर्तब झाला आहे. कसबामधून विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर, कॅन्टोन्मेंटमधून माजी मंत्री रमेश बागवे आणि शिवाजीनगरमधून दत्ता बहिरट यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर आली आहे.
रवींद्र धंगेकर –
काँग्रेसचे विद्यमान आमदार रविंद्र धंगेकर यांची ही तिसरी निवडणूक असेल. दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रविंद्र धंगेकर यांनी भाजपच्या हेमंत रासने यांचा पोटनिवडणुकीत पराभव केला आणि लगेच लोकसभेला पुन्हा उमेदवारी मिळवली. मात्र त्यांचा लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झाला. सामान्य माणसातून तयार झालेला एक आमदार म्हणून त्यांची ख्याती आहे.
रमेश बागवे –
सलग ५ वर्षे त्यांनी पुणे शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष पद सांभाळले. माजी गृहराज्यमंत्री असलेले बागवे २००४ ते २००९ दरम्यान पर्वती मतदारसंघाचे आमदार होते. २०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री राहिलेले रमेश बागवे हे पराभूत झाले असले तरी सुद्धा काँग्रेसचा जुना चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे.
दत्ता बहिरट –
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत दत्ता बहिरट यांचा ५ हजार १२४ मतांनी पराभव झाला होता. भाजपाचा बालेकिल्ला असतानाही काँग्रेसचे उमेदवार बहिरट यांनी दिलेल्या जोरदार लढतीमुळे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात यंदा ही चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
संग्राम थोपटे –
माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे चिरंजीव ते सुपुत्र. गेल्या चार दशकांपासून भोर विधानसभा मतदारसघांवर थोपटे कुटुंबाची सत्ता आहे. मोदी लाटेत सुद्धा त्यांनी त्यांचा गड कायम राखला. भोर म्हणजे थोपटे आणि थोपटे म्हणजे भोर असं समीकरण अनेकांच्या तोंडी आहे. अनेक विकास काम करत होते. यांनी मतदारसंघावर त्यांची पकड कायम ठेवली आहे.
संजय जगताप –
२०१९ मध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आघाडीमुळे संजय जगताप यांनी शिवसेनेच्या विजय शिवतारे यांचा पराभव केला. मोठं संस्थात्मक जाळं, अर्थसहाय देण्यात आघाडीवर तसचं विकास सोसायट्यांवर प्रभुत्व असलेल्या नावांपैकी एक असलेले संजय जगताप यांच्या उमेदवारीबद्दल काँग्रेसमध्ये फारसे दुमत नाही.
— गणेश मारुती जोशी.