हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी – मुंबई – महायुतीच्या जागावाटपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने “त्याग” करावा. लवचिकता दाखवून भाजपला जागावाटपात जास्त जागा देण्याचा वगैरे “सल्ला” केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एका बैठकीत खुद्द एकनाथ शिंदेंना दिला असल्याच्या बातम्या दुपारपर्यंत सगळ्या माध्यमांमध्ये फिरल्या.त्यावरून महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांच्या प्रवक्त्यांनी राजकीय बातम्यांचे पतंग हवेत उंच उडविले. परंतु, प्रत्यक्षात अमित शाह यांनी एकनाथ शिंदेंना असा कुठलाही सल्ला दिला नसल्याचा स्पष्ट खुलासा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करून माध्यमांच्या बातम्यांची “हवा” काढून घेतली.
महायुतीच्या जागावाटपात एकनाथ शिंदेंनी आग्रही भूमिका घेतली. त्यामुळे अमित शाह यांनी त्यांना थोडा “त्याग” करण्याचा सल्ला दिला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील स्वतःची जागा सोडायची तयारी दाखवून एकनाथ शिंदेंना भाजपला ताकदीनुसार जास्त जागा सोडायची तयारी दाखविण्याचा सल्ला दिला, अशा बातम्या माध्यमांनी त्यांच्या सूत्रांच्या हवाल्याने दिल्या होत्या. त्यावरून महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांनी एकनाथ शिंदेंना चिमटे काढले.
मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या पत्रकार परिषदेमध्ये त्या बातम्यांमधली “हवाच” काढून टाकली. माध्यमांनी ज्या बैठकीचा हवाला दिला, त्या बैठकीत मी स्वतःच हजर होतो. तिथे अमित शहा यांनी एकनाथ शिंदेंना असा कुठलाही त्यागाचा सल्ला दिला नाही, असा स्पष्ट खुलासा फडणवीस यांनी केला. उलट महायुतीचे जागावाटप व्यवस्थित दिशेने पुढे सुरू असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला. त्यामुळे माध्यमांनी परस्पर अमित शाहांच्या नावाखाली एकनाथ शिंदेंना त्यागाचा सल्ला दिल्याच्या बातम्यांच्या “पुड्या” सोडल्याचे उघड्यावर आले.
— अनुराग भालचंद्र साळुंखे.