हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी – पुणे – राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. अशात मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचे नेतृत्त्व करणारे मनोज जरांगे पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का याबाबत सतत चर्चा होत आहेत. अता अशात निवडणूक लढवायची की सत्ताधाऱ्यांचे आमदार पाडायचे याबाबतचा निर्णय 20 तारखेला होणार आहे.या विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाची भूमिका काय असणार याचा निर्णय घेण्यासाठी जरांगे पाटील यांनी 20 ऑक्टोंबरला समाजाची बैठक आयोजित केली आहे. यावेळी समाजातील जे कोणी निवडणूक लढवण्यासाठी उत्सक आहेत, त्यांनाही जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीला बोलावले आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका मंगळवारी जाहीर झाल्या असून, 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तर मतमोजणी 23 नोव्हेंबरला होणार आहे. त्यामुळे राज्यातील सर्व युत्या आणि आघाड्या कामाला लागल्या आहेत. एकीकडे सत्ताधारी महायुतीमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीत काँग्रेस, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे पक्ष आहेत.
अशात आता मनोज जरांगे पाटील जो निर्णय घेतील त्याचा कोणाला फायदा होणार आणि कोणाला फटका बसणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
विधानसभेच्या सद्यस्थितीबाबत बोलायचे झाले तर 288 सदस्यांच्या विधानसभेत 202 आमदार सत्ताधारी पक्षांचे आहेत. यामध्ये भाजपचे 102, राष्ट्रवादीचे 40, शिवसेनेचे 38 आणि इतर छोट्या पक्षांच्या 22 सदस्यांचा समावेश आहे.
दुसरीकडे विरोधी पक्षात काँग्रेसचे 37, शिवसेनेचे 16, राष्ट्रवादी (एसपी) 16 आणि इतर छोट्या पक्षांचे सहा आहेत. त्याचवेळी 15 जागा रिक्त आहेत.
—- गणेश मारुती जोशी.