HindJagar News – पुणे- पाणीपुरवठ्याच्या अभावी सामान्य नागरीक त्रस्त असतात. मात्र, पुण्यात पोलिसांना देखील याचा फटका बसला आहे. पुण्यातील शिवाजीनगर पोलीस वसाहतीत २२ मजली इमारतीत गेल्या दोन दिवसांपासून पाणीपुरवठा खंडित झाला आहे.सोसायटीतील सार्वजनिक ठिकाणची वीजही बंद झाली आहे. वीज बिल भरण्याअभावी पाणीपुरवठा खंडित करण्यात आल्यानं पोलीस कुटुंबीय बेहाल झाले आहेत.
शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात बैठ्या चाळींच्या जागी २२ मजली दोन इमारती चार वर्षांपूर्वी बांधण्यात आली होती. राजगड आणि शिवनेरी असे इमारतींचे नामकरण करण्यात आले. राज्यात पहिल्यांदाच पोलीस वसाहतीत गगनचुंबी इमारती बांधण्यात आल्या होत्या. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लावण्यासाठी तत्कालीन पोलीस आयुक्त के. वेंकटेशम यांनी पाठपुरावा केला होता.
२२ मजली इमारतीत पाणीपुरवठा, लिफ्ट, तसेच वापरातील जागेत बसविलेल्या दिव्यांसाठी (कॉमन स्पेस) तीन वीज मीटर बसविण्यात आले आहेत. या तीन मीटरचे बिल शासनाकडून जमा करण्यात येते. पोलीस आयुक्त कार्यालयामार्फत हे बिल महावितरणला अदा करण्यात येते. मात्र, काही दिवसांपासून वीजबील थकीत असल्यामुळे या इमारतीत वीजेसह पाणीपुरवठा देखील खंडीत झाला आहे. शासनाने एप्रिल २०२४ पासून बिलाचे पैसे पोलीस कार्यालयात जमा न केल्यानं पाणीपुरवठा करणाऱ्या मीटरवर कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर महावितरणने वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे येथील रहिवासी विशेषत: महिलांना या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. दैनंदिन वापरातील पाणी तळमजल्यावरून आणावे लागत असल्यामुळे कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबिय मेटाकुटीस आले आहेत.
न्यूस रिपोटेड – गणेश मारुती जोशी.