HindJagar News – पुणे – शहराचे माजी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या चौकशीमध्ये तब्बल 300 कोटींची संपत्ती उघड झाली असल्याचा दावा केला जात आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुप्ता यांच्या संपत्ती बाबत गुप्त चौकशी पूर्ण केली असून आता उघड चौकशीसाठी परवानगी मागण्यात आल्याचे समजते.अशाप्रकारे उच्चपदस्थ आयपीएस अधिकाऱ्याची चौकशी होण्याची ही पहिलीच वेळ असल्याची चर्चा आहे.
पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते सुधीर आल्हाट यांच्या मागणीवरून अमिताभ गुप्ता यांची अँटी करप्शन ब्युरोने चौकशी केली होती. या चौकशीत अनेक तथ्य समोर आल्यानंतर आता उघड चौकशीची मागणी करण्यात येत आहे. उघड चौकशीची मागणी मान्य झाल्यास अमिताभ गुप्ता यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.याबाबत आल्हाट यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमिताभ गुप्ता यांनी तब्बल 300 कोटीहून अधिकची संपत्ती विविध राज्यांमध्ये जमवली आहे. पुण्यातील प्रसिद्ध ॲमनोरा टाउनशिप मधील स्वीट वॉटर व्हिला प्रकल्पात त्यांनी जमिनीचा प्लॉट घेऊन त्यावर आलिशान व्हिला उभारला आहे. त्याची किंमत अंदाजे 25 ते 30 कोटी असल्याचा दावा आल्हाट यांनी केला आहे.
मुंबईतील सांताक्रुझ येथे आलिशान असा 22 कोटीचा फ्लॅट देखील त्यांच्या नावे असल्याचेही आल्हाट यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. याखेरीज इतर राज्यातील देखील मोठ्या प्रमाणात जमीन आणि संपत्ती खरेदी गुप्ता यांनी केली असल्याचं देखील अल्हाट यांचं म्हणणं आहे.त्यासोबतच पुणे पोलीस आयुक्तपदावर असताना अमिताभ गुप्ता यांनी 800 ते 1000 शस्त्र परवाने वाटले असून प्रत्येक परवान्यासाठी 15 ते 20 लाख रुपये घेतले असल्याचा धक्कादायक दावा देखील आल्हाट यांनी केला आहे. या सगळ्यांची विस्तृत चौकशी होणे गरजेचे आहे. त्यासाठी उघड चौकशी होणं आवश्यक असून उघड चौकशीसाठी सहा महिने उलटल्यानंतर देखील अद्याप परवानगी मिळालेली नाही.त्यामुळे ही परवानगी लवकरात लवकर मिळावी, अशी मागणी आल्हाट यांनी केली आहे
न्यूस रिपोटेड – P. S . Survanshi.