हिंदजागर प्रतिनिधी – आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा आज महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याहस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला, यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील उपस्थित होते.नवी मुंबईच्या मैदानामध्ये या पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या पुरस्कार सोहळ्यासाठी राज्यभरातून अप्पासाहेब धर्माधिकारी यांचे अनुयायी आले होते, पण या पुरस्कार सोहळ्याला गालबोट लागलं आहे. उष्माघातामुळे अनेक जण चक्कर येऊन खाली पडले आहेत, तर अनेक जणांना उलटीही झाली आहे. खारगघरमधील टाटा रुग्णालय, पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालय तसंच मेडी कव्हर रुग्णालयात काही जण ऍडमिट असल्याची माहिती आहे.
यातल्या काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. दरम्यान रुग्णालयात दाखल असलेल्या अनुयायांची भेट घेण्यासाठी स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते. एमजीएम रुग्णालयातही काही जणांना दाखल करण्यात आलं आहे. या रुग्णांची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एमजीएम रुग्णालयात आले.
- श्री.विनोद वाघमारे ( प्रतिनिधी )