हिंदजागर प्रतिनिधी – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अचानक पुणे कार्यालयाचा दौरा केला आहे, यामुळे पुण्यातील मनसेच्या नेत्यांची धावपळ झाली आहे. राज ठाकरे पुणे मनसे कार्यालयात असताना शहराचे अध्यक्ष साईनाथ बाबर आणि मनसेचे नेते बाबू वागस्कर पुणे महापालिकेत होते. राज ठाकरे पुणे मनसेच्या कार्यालयात जेव्हा पोहोचले तेव्हा एकही स्थानिक पदाधिकारी कार्यालयात नव्हता.
राज ठाकरे यांनी कार्यालयाचा अचानक दौरा केल्यामुळे मनसेच्या स्थानिक नेत्यांची मात्र चांगलीच पळापळ झाली. मनसेच नेते वसंत मोरे राज ठाकरेंच्या भेटीसाठी कार्यालयात दाखल झाले. राज ठाकरे आल्यामुळे पुण्यात मनसे कार्यालयातल्या घडामोडींना वेग आला.
राज ठाकरे अचानक कार्यालयात का आले? असं विचारलं असता चार ते पाच दिवसात राज ठाकरे मुंबईतून नवा निर्णय जाहीर करतील, असं बाबू वागस्कर यांनी सांगितलं. आजची बैठक नेमकी कशासाठी होती, हे लवकरच तुम्हाला कळेल, पण पक्ष बांधणीसाठी, पक्ष वाढीसाठी आणि ध्येयधोरणं ठरवण्यासाठी, आज महत्त्वाची बैठक पार पडल्याचं बाबू वागस्कर म्हणाले.
मागच्या काही दिवसांपासून पुण्यातले मनसेचे नेते वसंत मोरे नाराज असल्याच्या चर्चा आहेत. काहीच दिवसांपूर्वी वसंत मोरे यांनी सुप्रिया सुळे यांच्यासोबत एकाच गाडीने प्रवास केला होता. तसंच अजित पवार यांनीही वसंत मोरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यायची ऑफर दिली होती.
- श्री.गणेश मारुती जोशी ( प्रतिनिधी )