हिंदजागर प्रतिनिधी – गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं होतं. तशा बातम्या देखील समोर आल्या होत्या. मात्र मंगळवारी दुपारी अखेर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. मी भाजपसोबत जाणार नाही, जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादीसोबतच राहणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. त्यानंतर अजित पवार हे राष्ट्रवादीच्या वतीनं आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीला देखील हजर होते. या पार्टीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत अजित पवार यांनी हजेरी लावली. अजित पवार यांचं हे कथित बंड शमवण्यात शरद पवार पुन्हा एकदा यशस्वी झाल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.
अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील क्रमांक दोनचे नेते मानले जातात. ते पक्षावर गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याच्या बातम्या समोर आल्या. तसचे ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची देखील जोरदार चर्चा सुरू होती. मात्र अजित पवार हे भाजपसोबत जाणार नाहीत, यावर शरद पवार हे शेवटपर्यंत ठाम होते. यापूर्वी 2019 मध्ये अजित पवार यांनी भाजपसोबत जाऊन सरकार स्थापन केलं होतं. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.
अजित पवार हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चेला उधाण आल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला होता. अजित पवार यांच्यावर केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव असल्याचं राऊत यांनी म्हटलं होतं. अजित पवार हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चेला उधाण आल्यानंतर महाविकास आघाडीमधील प्रमुख नेत्यांचा एका कॉन्फरन्स कॉल झाला. मात्र याला अजित पवार उपस्थित नव्हते. तसेच त्यांनी त्यांचा सासवडचा दौरा देखील अचानक रद्द केला होता. त्याचदरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे दिल्लाला गेल्यानं चर्चेला उधाण आलं.
याचदरम्यान अजित पवार यांनी काही आमदारांची जमवाजमव केल्याच्या बातम्या देखील समोर आल्या. अजित पवार यांना राष्ट्रवादीच्या 54 आमदारांपैकी 40 आमदारांचं समर्थन असून, समर्थन पत्रावर त्यांच्या सह्या असल्याची देखील बातमी समोर आली. या बातमीमुळे राज्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आलं. मात्र शरद पवार यांनी या सर्व शक्यता फेटाळून लावल्या. त्यांनी राष्ट्रवादीचे सर्व आमदार आपल्या संपर्कात असल्याचं सांगितलं. त्यानंतर लगेचच अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपन राष्ट्रवादीसोबतच राहणार असल्याचं स्पष्ट केलं.
मात्र सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार अजित पवार यांची भाजपसोबतची चर्चा आणि आमदारांसोबतच्या बैठकीबाबत शरद पवार यांना आधीच माहिती होती. त्यांनी योग्य ती पाऊलं उचलत ही बंडखोरी रोखल्याच्या देखील चर्चा आता सुरू झाली आहे.
- श्री.गणेश मारुती जोशी ( प्रतिनिधी )