पुणे प्रतिनिधी – एकतर्फी प्रेमात नकार दिल्याने तरुणीला त्रास देण्यासाठी त्याने राजकीय नेते, आमदार, माजी नगरसेवक, बांधकाम व्यावसायिक यांना खंडणी मागण्याचा प्रकार केल्याचे उघडकीस आले आहे.इतकेच नाही तर शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे, काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी नगरसेवक श्रीनाथ भीमाले, साईनाथ बाबर यांनाही खंडणीसाठी धमकी देण्याचे त्याचे पुढील टार्गेट होते. गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने त्याला अटक करून हा सर्व प्रकार समोर आणला आहे. शाहनवाज गाझीयखान (वय ३१, रा. मका मस्जिदजवळ, गुरुवार पेठ, सध्या रा. कोंढवा बुद्रुक) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. यापूर्वी अशाच गुन्ह्यात इम्रान समीर शेख (वय ३७, रा. घोरपडीगाव) याला अटक करण्यात आली होती.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, इम्रान शेख आणि शाहनवाज हे पुणे मॅरेज ब्युरोचे ॲडमीन व सदस्य आहेत. इम्रानने शाहनवाज याचे स्थळ एका तरुणीसाठी सुचविले होते. तिने हे स्थळ नाकारले. त्यानंतर इम्रानने तिला मागणी घातली होती. त्यालाही तिच्या घरच्यांनी नकार दिल्यावर इम्रानने तरुणीचा फोटोचा वापर करून तिच्या नावाने फेसबुक अकाउंट तयार केले. तिचे फोटो मॉर्फ करून अश्लील फोटो प्रसारित केले. त्याबाबत चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन त्याला गेल्या वर्षी अटक झाली होती.
शाहनवाज हा वेगवेगळ्या व्हॉट्सॲप मॅरेज ब्युरो ग्रुपमध्ये सहभागी असून, त्याने स्वत:च्या डीपीला महिलेचा फोटो लावून ग्रुपमधील लोकांशी महिला असल्याचे भासवून चॅटिंग करत असे. व्हॉट्सॲपचा ओटीपी मागून त्यांचे व्हॉट्सॲप तो हॅक करत होता. या हॅक केलेल्या व्हॉट्सॲप नंबरवरून तो राजकीय व्यक्ती, व्यावसायिकांना खंडणी मागत होता. अशा पद्धतीने त्याने माजी नगरसेवक दीपक मिसाळ, मनसे नेते वसंत मोरे यांचा मुलगा रूपेश, व्यावसायिक अनुज गोयल, माजी नगरसेवक अविनाश बागवे, आमदार महेश लांडगे यांना खंडणी मागितली होती.
नकार दिल्याने बदल्याची भावना…
तरुणीच्या कुटुंबातील व्यक्तींची बदनामी व्हावी व त्रास व्हावा, यासाठी राजकीय व व्यावसायिक व्यक्तींच्या नावे त्याने ३० लाखांची खंडणी मागितली. या सर्व गुन्ह्यांमध्ये खराडीतील युऑन आयटी पार्कजवळ उभ्या असलेल्या तरुणीच्या कारमध्ये खंडणीची रक्कम ठेवण्यात सांगत. जेणे करून पोलिस त्यांची चौकशी करीत व त्यांना त्रास देतील, असा त्याचा प्रयत्न होता.
यूट्यूबवरून मिळवली माहिती
या सर्वाची माहिती शाहनवाज याने यूट्यूबवरुन घेतली होती. त्याच्याकडून गुन्ह्याच्या अनुषंगाने, स्क्रीन शॉट, बनावट मॅरेज सर्टिफिकेट नामांकित व्यक्तींची नावे त्याच्याकडील मोबाइल आणि लपवून ठेवलेल्या डीव्हाइसमधून सापडली आहेत.
ही कामगिरी पोलिस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर, सहायक पोलिस निरीक्षक चांगदेव सजगणे, उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, मोहनदास जाधव, अजय जाधव, अंमलदार विजय गुरव, विनोद साळुंके, प्रदीप शितोळे, शैलेश सुर्वे, सचिन अहिवळे, राहुल उत्तरकर, सैदोबा भोजराव, अमोल पिलाने, अय्याज दड्डीकर यांनी केली.
- श्री.गणेश मारुती जोशी प्रतिनिधी