हिंदजागर प्रतिनिधी – मध्यप्रदेशातून पुण्यात मेफेड्रोन (एमडी) हा अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या टोळक्याच्या गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मुसक्या आवळल्या. पोलिसांनी त्यांच्याकडून सव्वा दोन कोटी रुपये किंमतीचा तब्बल एक किलो 108 ग्रॅम वजनाचा मेफेड्रोन जप्त करीत दोघांना अटक केली.पुण्यात आज संगीतकार ए.आर.रहमान यांचा कार्यक्रम होणार आहे. त्यापूर्वी हे ड्रग्स जप्त करण्यात आले आहेत. या कार्यक्रमानिमित्त माफियांनी मोठा प्लॅन केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. मात्र याबाबत अधीकृत माहिती मिळाली नाही.
आरोपींना अटक –
आझाद शेरजमान खान ( वय 35) व नागेश्वर राजाराम प्रजापती (वय 35, दोघेही रा.पिपलखेडी, अलोट, रतलाम, मध्य प्रदेश) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. तर एका विधी संघर्षीत बालकांचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरामध्ये अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त रितेश कुमार व पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिले आहेत. त्यानुसार, गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाडून अंमली पदार्थ विरोधी कारवाई अधिक कडक करण्यास सुरुवात केली आहे.
अशी केली कारवाई –
पोलीस कर्मचारी मनोजकुमार साळुंखे, मारुती पारधी हे दोघेजण आपली गस्त घालत होते. त्यावेळी मध्य प्रदेशातील काही व्यक्ती पुण्यात अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी खराडी येथे सापळा रचून संबंधित वाहनाची तपासणी करण्यास सुरुवात केली.त्यावेळी एक दुचाकी खराडीकडून पुण्याच्या दिशेने निघाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी त्यांना तत्काळ थांबविले. त्यांची अंगझडती घेतली असता, त्यावेळी त्यांच्याकडे दोन कोटी 21 लाख 60 हजार रुपये किंमतीचे व एक किलो 108 ग्रॅम वजनाचे मेफेड्रोन, 31 हजार रुपयांचे 4 मोबाईल, रोख रक्कम असा ऐवज जप्त केला.
पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, पोलीस कर्मचारी मनोजकुमार साळुंखे, मारुती पारधी, पांडुरंग पवार, विशाल दळवी, राहुल जोशी, विशाल शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
- श्री.गणेश मारुती जोशी ( प्रतिनिधी )